मुंबई : मानखुर्दमधील मंडाला भागात कुर्ला स्क्रॅब विभागाला भीषण आग लागली आहे. तब्बल पाच तासांनंतही ही आग धुमसतीच आहे. गेल्या चार तासांपासून अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मानखुर्दमध्ये लागलेल्या या आगीमागे माफिया आणि पालिकेची पार्टनरशिप असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर मानखुर्दचे स्थानिक आमदार अबू आझमी यांनी सरकार यासंदर्भात बेजबाबदार भूमिका घेत असल्याचा आरोप केलाय.


किरीट सोमय्या यांनी बोलताना सांगितलं की, "मानखुर्दमध्ये हा जो कचऱ्याचा अड्डा आहे. तो माफियांचा अड्डा झालेला आहे. कारण चार साडेचार वर्षांपूर्वी अशीत भीषण आग लागली होती. तिथे ऑईल माफिया, कचरा माफिया हे सगळे एकत्रित येतात. पण पुढे कारवाई होत नाही. चार, सहा महिने सुधारणा होते. पण मुंबई पालिकेतच माफिया बसलेले आहेत. त्यामुळे पुन्हा हे माफिया बेफाम काम करतात. आजही जी आग लागली आहे त्यामागे माफियांचाच हात आहे. जोपर्यंत मुंबई महापालिकेचे माफिया दूर होत नाहीत, तोपर्यंत हा आगीचा शाप तसाच राहणार."


स्थानिक आमदार अबू आझमी यांनी सांगितलं की, "याठिकाणी अनधिकृत व्यवसायामुळे दरवर्षी येथे आग लागते. यासंदर्भात आम्ही अनेकदा विधानभवनातही सांगितलं आहे. तसेच पत्रदेखील दिलं आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे इथे दरवर्षी आग लागते. तसेच मोठ्या प्रमाणावर आग लागते. त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे. अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून याची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे सरकार यासंदर्भात बेजबाबदार भूमिका घेत आहे असं मला वाटत आहे."


दरम्यान, गेल्या तीन तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर तुर्तास वाहतूक बंद करण्यात आली आहे. नवी मुंबईकडे जाणाऱ्यांनी ऐरोली मार्गे जाण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. तसेच ईस्टर्न एक्सप्रेस वेवर छेडा नगरजवळ ट्रॅफिक जाम आहे. कुर्ला स्क्रॅब भागात लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या वखारी आहेत. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या भागांत मोठ्या प्रमाणावर रहिवाशी वस्ती आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mankhurd Fire | मानखुर्दच्या मंडल परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल