मुंबई : मुंबई ही सर्वांचीच आहे, पण सर्वात पहिला ती मराठी माणसाची आहे. त्यामुळे भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. भाजपच्या नावावर असे प्रकार कुणी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मुंबई भाजपची असल्याचं सांगत एका मारवाडी दुकानदाराने मराठी महिलेला मारवाडी बोलण्याची सक्ती केल्याचा प्रकार गिरगावातील खेतवाडीमध्ये घडला होता. त्यावर लोढा यांनी प्रतिक्रिया दिली. 


मुंबईत मराठी न बोलता ठराविक भाषेत बोला अशी सक्ती कुणी करत असेल तर ती चुकीची आहे असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. तसेच भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. 


काय म्हणाले मंगलप्रभात लोढा? 


गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध!


मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे!
त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे!
भाजपचे नाव घेऊन, अशे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत!


आपली मुंबई सर्वांची आहे!, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे.
जाहीर निषेध! 


 




मराठी महिलेला मारवाडी बोलण्याची सक्ती


गिरगावातील खेतवाडी या ठिकाणी एका मराठी महिलेला मारवाडी भाषेत बोलण्याची सक्ती करण्यात आली. मुंबई ही भाजपची असून आता मारवाडी भाषेतच बोलायचं अशा शब्दात एका दुकानदाराने अरेरावी केली.  त्या महिलेने मनसेच्या कार्यकर्त्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दुकानदाराला चोप देत माफी मागायला लावली. 


मंगलप्रभात लोढा उद्धव वागल्याचा महिलेचा आरोप


या प्रकरणाची तक्रार आपण आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली. पण लोढा यांनी आपल्याला उद्धट उत्तर दिलं. तसेच आमच्या-आमच्यात भांडण लावतेय असा आरोप केल्याचा दावा त्या महिलेने केला. आमदार असूनही आपल्याला न्याय द्यायचं तर सोडाच पण ओळखही दाखवली नाही अशी तक्रार त्या महिलेने केली होती. त्यावर मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं. 


ही बातमी वाचा: