मुंबई : देशातील लोकसंख्येचा मोठा भार वाहणारं शहर म्हणजे मुंबई. येथे माणसांना धक्के खात लोकलने प्रवास करावा लागतो. अशातच एक महाभाग चक्क शेळी घेऊन लोकलने प्रवास करत होता, तेही तिकीट न काढताच. मग काय? व्हायचं तेच झालं. टीसीची नजर या शेळी घेऊन जाणाऱ्या माणसावर पडली आणि टीसीने त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली.
रेल्वेच्या नियमावलीनुसार रेल्वेतून प्राण्यांना घेऊन जाण्यास बंदी आहे. अशातच हा इसम शेळी घेऊन लोकलमधून प्रवास करत होता. वर त्याने स्वत:चंही तिकीट काढलं नव्हतं. टीसीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी या महाभागाने शेळी तिथेच ठेवून पळ काढला.
टीसीला तर त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं. मग टीसीने त्याची शेळी ताब्यात घेतली. नंतर शेळीला सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं आणि आता रेल्वेकडून शेळीचा लिलावही करण्यात आला आहे.
अडीच हजार रुपयांना शेळीचा लिलाव करण्यात आला. अब्दुल रहेमान नावाच्या लगेजमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने शेळी विकत घेतली आहे.