मुंबई : मुंबईत मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका दुचाकी चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे होंडा अॅक्टिव्हा या एकाच मेकच्या तब्बल 17 स्कूटरची चोरी त्याने केल्याचं उघडकीस आलं आहे. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
35 वर्षांच्या राजू नथुलाल शर्माला दुचाकी चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. वाहनचोरीमागील कारण जेव्हा पोलिसांना समजलं, तेव्हा सगळेच जण अवाक झाले. अॅक्टिव्हा ही एकमेव स्कूटर त्याला चालवता यायची, असं त्याने पोलिस चौकशीत सांगितलं.
धारावी, माहिम, वाकोला, भोईवाडा, लोकमान्य टिळक मार्ग, अँटॉप हिल आणि साहूनगर या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून त्याने अॅक्टिव्हा चोरल्याचं तपासात समोर आलं आहे.
विक्रीसाठी चोरी :
राजू ग्राहकांकडून दोन ते पाच हजार रुपयांचा अॅडव्हान्स घ्यायचा. त्यानंतर सेकंड हॅण्ड स्कूटर मिळवून देण्याचा दावा तो करत असे आणि चोरलेल्या वाहनांची विक्री करत असे. कुर्ल्याजवळ संशयास्पदरित्या वावरताना स्थानिकांनी त्याला पाहिलं आणि पोलिसांच्या हाती दिलं.
पोलिसांनी तब्बल 4.80 लाख रुपये किमतीच्या दुचाकी गोवंडी, सांताकृझ, असल्फा आणि साकीनाका परिसरातून जप्त केल्या आहेत. पाच पोलिस स्थानकांमध्ये संबंधित वाहनांच्या चोरीची तक्रारही नोंदवली गेली आहे.