मुंबई : टॅक्सीचालकांची मुजोरी मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र टॅक्सी चालकांच्या या अडेलतट्टूपणामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेण्यास टॅक्सीचालकांनी नकार दिल्याने उपचारात दिरंगाई होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर ही दुर्दैवी घटना घडली. मोहम्मद युसुफ यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. मात्र एकही मुजोर टॅक्सीचालक त्यांना घेऊन रुग्णालयात जाण्यास तयार होता नव्हता.

नायर रुग्णालय अवघ्या काही अंतरावर असल्याने टॅक्सी चालक 'जवळचं भाडं' नाकारत असल्याची माहिती आहे. अखेर, वेळीच उपचार न मिळाल्यामुळे मोहम्मद युसुफ यांचा मृत्यू झाला. ते नांदेडचे रहिवासी होते.

भावेश पटेल नावाच्या एका व्यक्तीने या घटनेचं फेसबुक लाईव्ह केलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत पोलिस आणि जवानही दिसत आहेत. परंतु टॅक्सीचालक वर्दीलाही जुमानत नसल्याचं दिसत आहे.