Mumbai News: मुंबई : समजा तुम्हाला खूप भूक लागलीये, तुमची चमचमीत खाण्याची इच्छा झाली म्हणून तुम्ही मुंबईतील एका चांगल्या रेस्टॉरंटमधून ऑनलाईन ऑर्डर केलं. ऑर्डर केलेलं जेवण आलंही, पण त्या जेवणात उंदीर निघाला तर? किळस वाटली ना? किळसवाणाच प्रकार आहे. मुंबईतील (Mumbai News) एका आलिशान रेस्टॉरंटच्या पदार्थात मृत उंदीर सापडल्याचा दावा पीडित व्यक्तीनं केला आहे. या घटनेनंतर ती व्यक्ती 75 तास रुग्णालयातच होती.


प्रयागराजमधील रहिवाशी असलेली एक व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरात कामानिमित्त आली होती. त्यावेळी भूक लागल्यानं या व्यक्तीनं मुंबईतील बार्बेक्यू नेशनमधून शाकाहारी पदार्थ ऑर्डर केला होता. 


बार्बेक्यू नेशनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, असा दावाही पीडित व्यक्तीकडून करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीनं ट्विटरवर एक ट्वीट करत याप्रकरणी मदतीची मागणी केली आहे. 


पीडित राजीव शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, पीडित व्यक्ती 8 जानेवारी 2024 रोजी प्रयागराजहून मुंबईत आला होती आणि त्या व्यक्तीनं बार्बेक्यू नेशनमधून शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली. ऑर्डर आली आणि व्यक्तीनं जेवण्यासाठी जेवणाचे डब्बे उघडण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्यातील एका डाळीच्या डब्ब्यात मेलेला उंदीर आढळून आला. जोपर्यंत व्यक्तीला हा उंदीर दिसता तोपर्यंत फार उशीर झाला होता. ज्या पदार्थात मेलेला उंदीर आढळून आला, तो पदार्थ त्या व्यक्तीनं खाल्ला होता. यामुळे व्यक्तीची प्रकृती खालावली होती आणि त्यासाठी तब्बल 75 तासांहून अधिक काळ त्याला रुग्णालयात अॅडमिट व्हावं लागलं होतं. तसेच, याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केलेला नाही. 






पोलिसांनी FIR नोंदवला नाही; पीडित व्यक्तीचा दावा 


पोलिसांनी एफआयआर न नोंदवल्याबाबत सोशल मीडिया हँडलवर माहिती देताना पीडितेनं सांगितलं की, मी 8 जानेवारीला प्रयागराजहून मुंबईला गेलो होतो, तिथे मी बारबेक्यू नेशनमधून शाहकरी पदार्थ ऑर्डर केले होते, त्यात मेलेला उंदीर सापडला होता. यानंतर प्रकृतीच्या चिंतेमुळे मला 75 तास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यासंदर्भात मी पोलिसांत तक्रार दाखल केली असून नागपाडा पोलिसांनी अद्याप माझा एफआयआर नोंदवलेला नाही.


BBQ नेशनकडून निवेदन जारी 


या प्रकरणासंदर्भात बारबेक्यू नेशननं आपली बाजूही स्पष्ट केली आहे. या घटनेबाबतच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, आम्हाला राजीव शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून तक्रार प्राप्त झाली आहे. ज्यात त्यांनी आमच्या एका शॉपमधून 8 जानेवारी रोजी ऑर्डर केलेल्या पदार्थामध्ये मृत इंदीर आढळल्याचा आरोप केला आहे. आम्ही याप्रकरणाची गंभीर दखल घेत, याबाबत चौकशीही केली आहे. पण आम्हाला अशा कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नाहीत. याशिवाय, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांनीकडूनही तपासणी करुन घेतली आहे आणि आम्हाला असं कोणतंही प्रकरण आढळून आलेलं नाही. याप्रकरणासंदर्भात पुढील कोणत्याही प्रकारच्या तपासणीत अधिकारी किंवा पोलिसांना आमच्याकडून पूर्ण सहकार्य केलं जाईल.