पालघर : कोरोना काळात जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात अंगणवाड्या, ग्राम बाल विकास केंद्रे, आरोग्य व्यवस्था आदींवर प्रशासनाने हवा तसा भर न दिल्यामुळे पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषणाची स्थिती चिंताजनक बनली आहे. कुपोषणासह बालमृत्यू आणि मातामृत्युच्याही विळख्यात जिल्हा सापडत चालला आहे. जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या एप्रिल, मे या दोन महिन्यातच पाच मातामृत्यूची नोंद झाली तर 40 बालमृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच दोन महिन्यांच्या तुलनेत दोन मातामृत्यू ची वाढ झाली असल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे.


पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जव्हार, मोखाडा, डहाणू तलासरी व वाडा अशा भागांमध्ये कुपोषणाबरोबरीने बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यात 296 बालमृत्यू तर बारा मातामृत्यूची नोंद झाली होती. यंदा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाच माता मृत्यूची आणि 40 बालमृत्यूची नोंद झाल्यामुळे जिल्हा कुपोषणाच्या खाईत अडकून पडला आहे. माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले जात आहे.


कोरोना काळात जिल्हा परिषदेमार्फत गरोदर माता आणि बालकांना गृहभेटी देऊन सकस तसंच पोषण आहार देण्यात आल्यानंतर ही कुपोषणाचा आकडा कमी का होत नाही हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले जात आहे. पालघर जिल्ह्यामध्ये कमी वजनाच्या बाळांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. याच बरोबरीने श्वास गुदमरणे आदी कारणामुळेही अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. अल्पवयीन वयात लग्न करणे, गरोदरपणात आरोग्याची जनजागृती नसल्यामुळे मातामृत्यू होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून होत आहे.


ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्ह्याचे स्वतंत्र विभाजन झाल्याच्या सहा वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या जैसे थेच आहे. प्रशासन कोट्यावधीचा निधी कुपोषण निर्मूलनासाठी खर्च करत असेल तर कुपोषण कमी का होत नाही असे प्रश्न विविध स्तरातून उपस्थित केले जात आहेत. जिल्ह्याला मातामृत्यूसह बालमृत्यूची समस्या भेडसावत असली तरी अति तीव्र कुपोषित बालके व तीव्र कुपोषित बालकांच्या वाढत्या आकडेवारीमुळे ही समस्या अधिक जटील बनत आहे. पालघर जिल्ह्यात एकट्या एप्रिल महिन्यात 146 अति तीव्र कुपोषित तर 1609 तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. मे महिन्यात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या महिन्यामध्ये 139 अतितीव्र तर 1679 अतितीव्र बालके आढळली आहे.


पावसाळा सुरू झाल्यानंतर अति तीव्र कुपोषित, तीव्र कुपोषित, मातामृत्यू ,बालमृत्यूचा आलेख वाढतच जात असतो, याचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाला अपयश आले आहे. हे दरवर्षी होत असते. स्थलांतर हे यामागचे मोठे कारण असून गेल्या दोन वर्षात प्रशासकीय यंत्रणा करोनाच्या नियोजनात असल्याने कुपोषणाकडे दुर्लक्ष झाल्याने ही आकडेवारी वाढली असल्याचे यंत्रणेने म्हटले आहे. मातामृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषण थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे.


प्रतिक्रिया:
जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांमार्फत कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुनरागमन शिबिरे, गृहभेटी आयोजन करुन कुपोषण नियंत्रणात येईल असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली आहे.


एप्रिल आणि मे 2021 ची आकडेवारी


तालुका        अतितीव्र कुपोषित  तीव्र कुपोषित
डहाणू                     22                  335
तलासरी                   2                   197
मोखाडा                 56                   449
जव्हार                 106                 1189
वि. गड                  50                   482
वाडा                     35                   450
पालघर                    8                  113
वसई                     10                  125
एकूण                 295                 3288


बालमृत्यू वर्षनिहाय


2015-16 - 565
2016-17 - 557
2017-18 - 469
2018-19 - 348
2019-20 - 303
2020-21 - 296
2021-22 - 40 (एप्रिल-मे)



एप्रिल आणि मे दोन महिन्यातील बालमृत्यू आणि मातामृत्यू


तालुका  बालमृत्यू   मातामृत्यू
मोखाडा       1             --
जव्हार       12             3
विक्रमगड     6             --
वाडा            3             --
पालघर        5             --
तलासरी       2             1
डहाणू          9             --
वसई            2             1
एकूण         40             5