मुंबई : मॉलमध्ये वाईन शॉप असलेल्यांनाही ऑनलाईन होम डिलिव्हरी पद्धतीने मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दक्षिण मुंबईतील एका मॉलमधील मद्यविक्रीचे दुकान असलेल्या मालकानं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची दखल घेत उच्च न्यायलयाने राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील सीआर- 2 मॉलमधील ओजस मार्केटिंग मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे 'वर्ल्ड ऑफ वाईन' नामक वाईन शॉप आहे. शॉप हे मॉलमध्ये असले तरी त्यांना स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. मात्र तसे असूनही त्यांना स्टॅण्ड अलोन (एकल) दुकान म्हणून परवानगी देण्यात आली नाही. त्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली.
आपलं शॉप हे मॉलमध्ये असलं तरी दुकानात येण्या-जाण्यास स्वतंत्र मार्गिका आहे. तसं असूनही महापालिका प्रशासनाकडून स्टॅण्ड अलोन (एकल) शॉप म्हणून परवानगी नाकारण्यात आली असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मुंबई महापालिकेच्या 22 मे च्या परिपत्रकानुसार होम डिलिव्हरीद्वारे ऑनलाईन मद्य विक्रीस सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत परवानगी दिली होती. त्यामुळे मॉलमधील वाईन शॉपनाही ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला याबाबत उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब केली.