मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईत अनेक समस्या उद्भवतात. पावसामुळे रस्त्यावर खड्डे, पाणी तुंबणे, गटारं, मॅनहोल उघडी राहिल्याने होणारे अपघात अशा अनेक समस्या निर्माण होतात. मात्र आता मुंबईकरांच्या या नागरी समस्या आता एका ट्विटवर दूर केल्या जाणार आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्या सुचनेनुसार प्रशासन आता सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची दखल घेवून त्या सोडवल्या जाणार आहेत.

खासकरून या पावसाळ्यात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा वापर करण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे. यासाठी आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून @diasterMgmtBmc हे ट्विटर हॅण्डल देण्यात आले आहे. या ट्विटर हॅण्डलवर नागरिक आपल्या समस्यांबाबत ट्वीट करू शकणार आहेत.

पाणी साचणे, गटारी तुंबणे, रस्त्यांवरील खड्डे, कचरा, मॅनहोल उघडे असणे, झाडांच्या धोकादायक फांद्या किंवा फांदी पडणे अशा विविध समस्या तिथल्या ठिकाणाचा उल्लेख तसंच फोटोसह ट्वीट नागरिकांना करता येणार आहेत.

या संदर्भात ट्वीट आल्यानंतर तात्काळ दखल आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून घेतली जाणार आहे. तसेच संबंधित तक्रार संबधित विभागाकडे पाठवली जाणार आहे.

गेल्या चार दिवसांत ट्विटरवर आलेल्या 1200 हून तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. आगामी काळात फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही तक्रारी करता येणार आहेत.

तसंच नेहमीप्रमाणे 1916 या नंबरवरही तक्रार करता येणार आहे.