जोडाक्षरामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम होत असून गणिताची नावड निर्माण होत असल्याचं बालभारतीचं म्हणणं आहे. शिवाय इंग्रजीसोबतच कानडी, तेलगू, तामिळ भाषांमध्येही अशाच प्रमाणे शिक्षण होत असल्याचं बालभारतीनं सांगितलं आहे.
बालभारतीने नव्याने संख्यावाचनाबाबत केलेला बदल खेदजनक असल्याची प्रतिक्रिया शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना गणित हा कायम कठीण विषय वाटतो. तो सोपा कसा करता येईल, याबाबत विभागाने प्रयत्न करायला हवा. मात्र तसं न करता परंपरागत संख्यावाचन बदलण्याचा घाट कोण आणि का घालत आहे, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काळे सभागृहात करणार आहोत.
शिक्षणामध्ये आतापर्यंत जे जे विनोद झाले आहेत, जे काही झालं आहे ते आता नव्या शिक्षण मंत्र्यापुढे वाढून ठेवलं आहे, असा टोला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी लगावला. संख्यावाचनाची ही नवी पद्धत चुकीची आहे. मराठी भाषा मारायला हे निघाले आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना हे काहीतरी वेगळं सुरु असल्याचं ते म्हणाले. कितीही खर्च झाला तरी मराठीची पुस्तकं बदलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामीण भागातल्या मुलांना खरं शिक्षण मिळतं का ? एक मास्तर चार वर्ग चालवतात अशी परिस्थिती आहे. या मूलभूत प्रश्नाला हात घालण्याऐवजी हे काय चाललं आहे? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.