ठाणेः भिवंडीतील गैबी नगर परिसरातील नूर कॉम्प्लेक्सच्या माजिद इमारतीचा पिलर तुटल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या इमारतीत एकूण 81 कुटुंब राहतात. हा इमारतीचा मुख्य पिलर असल्याने रहिवाशी चिंतेत पडले आहेत.

 

भयभीत रहिवाशांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागाला माहिती देताच विभागाचे कर्मचारी आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीची तात्काळ पाहणी करून 30 ते 35 कुटुंबांना घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

माजिद इमारत ही केवळ 5 वर्षे जुनी असून तिची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे इमारत तात्काळ खाली करण्यात आली. या आधी भिवंडीत दोन इमारती पडण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्याने प्रसंगावधान राखत अगोदरच रहिवाशांना घरं खाली करण्यास सांगितलं आहे. माजिद इमारतीचे 6 पिलर अतिधोकादायक आहेत. त्यामुळे ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे.