मुंबई: रिओ ऑलम्पिकमध्ये ललिता बाबर भारतासाठी पदकांची लयलुट करेल अशी आशा आहे. अतिशय कठीण प्रसंगात तिने हा टप्पा गाठला आहे. तिच्या जिद्दीला एबीपी माझाच्या माझा सन्मान २०१६ पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.

 

ललिता बाबरचा थोडक्यात परिचय

 

कोरड्याठाक नद्या, सुकलेले बंधारे आणि ओसाड पडलेल्या जमिनी...  साताऱ्याच्या माणदेशात वर्षानुवर्षे हेच चित्र आहे. त्या दुष्काळी परिस्थितीशी कठोर संघर्ष करून उदयास आलेली ललिता बाबर आज रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकाची आशा बनली आहे. ललिता एक मॅरेथॉन रनर म्हणून गेली पाच वर्षे देशभरातल्या रोड रेसेस गाजवत आहे.

 

मुंबई मॅरेथॉनमधल्या भारतीय महिलांच्या गटात, ती गेली दोन वर्षे रौप्यपदकाची मानकरी ठरली. त्याआधी सलग तीन वर्षे ललिता विजेती ठरली होती. याच कालावधीत परदेशी प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव यांनी तिच्यातली 3000 मीटर्स स्टीपलचेससाठीची गुणवत्ता ओळखली आणि गेल्या दोन वर्षांमध्ये ललिता ट्रॅकवरही पळायला लागली.

 

2014 सालच्या एशियाडमध्ये ती स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाची मानकरी ठरली. मग 2015 साली आशियाई अॅथलेटिक्समध्ये ललितानं स्टीपलचेसचं सुवर्णपदक जिंकलं. बीजिंगमधल्या जागतिक अॅथलेटिक्समध्ये तिनं स्टीपलचेसची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला. तीच ललिता बाबर आता रिओ ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी सज्ज झालीय. ऑलिम्पिकच्या मोहिमेसाठी तिला एबीपी माझाच्याही हार्दिक शुभेच्छा.