भिवंडी : भिवंडीतील राजनोली नाका येथील 'स्विट हार्ट' या लेडीज ऑर्केस्ट्रा बारचा चालक अमोल बोऱ्हाडे याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी कोनगाव पोलिसांनी इंदुरमधून दोघांना अटक केली. आरोपींच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार जखमी बार चालक अमोल बोऱ्हाडेच आहे. अमोलने यूट्युबवरील व्हिडीओ पाहून कर्जाचा ससेमिरा चुकवण्यासाठी हे नाटक रचल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.


गेल्या महिन्यात 28 मे रोजी रात्री 2.30 वाजताच्या सुमारास 'स्विट हार्ट' या लेडीज बारचा चालक अमोल बोऱ्हाडे बारच्या मागील बाजूस सिगरेट पित उभा होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्याच्या पाठीच्या वरच्या बाजूला गोळीबार करीत जखमी केले होते. याबाबत कोनगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवत हल्लेखोरांचा तपास सुरु केला.


इंदुर येथून कपिल कथोरे व इरफान शेख या दोन आरोपींना गावठी कट्ट्यासह पोलिसांनी अटक केली. कोनगाव पोलिसांनी कसून चौकशी केली असता या प्रकरणातील फिर्यादीच आरोपी असल्याचं समोर आलं. गोळीबारातील जखमी अमोल बोऱ्हाडे याचे आरोपींसोबत मोबाईल संभाषण झाल्याचे व या गुन्ह्यातून आरोपींना सोडवण्यासाठी मदत करणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.


बार चालक अमोल बोऱ्हाडे याने आपल्या व्यवसायासाठी बऱ्याच ओळखीतील व्यक्तींकडून सुमारे तीन कोटी रुपये कर्ज घेतलं होतं. मात्र कर्ज फेडणे सध्या अमोलला शक्य नव्हते. त्यामुळे देणेदारांच्या रोजच्या चौकशीपासून सुटवा व्हावी यासाठी अमोलने हा बनाव रचला.


बनाव रचण्यासाठी अमोलने यूट्युबवरील व्हिडीओची मदत घेतली. एका व्हिडिओनुसार उजव्या पाठीच्या वरच्या बाजूस गोळी लागल्यास इसम जखमी होऊ शकतो मात्र मृत्यू होणार नाही, याची कल्पना अमोलला होती. त्यानंतर आपल्या ओळखीतील कपिल कथोरे व इरफान शेख यांच्यासोबत चर्चा करुन या गोळीबाराचे नाटक रचले.