मुंबई :  मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)  परिसरात शुक्रवारी सकाळी एक साप (Snake) आढळून आला. मुख्य इमारतीच्या जवळच असलेल्या पंपहाऊसच्या शेजारीच एका दालनात हा साप आढळून आला. सकाळी 9:30 वाजताची वेळ असल्यानं त्यावेळी तिथं फारशी वर्दळ नव्हती. उपस्थित कर्मचा-यांनी तात्काळ या घटनेची बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं हा साप पकडण्यासाठी सर्पमित्राला पाचारण केलं.


सर्पमित्र वाल्मिकी यांनी तात्काळ हायकोर्ट गाठत या सापाला मोठ्या शिताफिनं ताब्यात घेतलं. धामण जातीचा साधारण 4.5 ते 5 फुटांचा हा बिनविषारी साप होता. त्यानंतर या सापाला संरक्षित अधिवासात सोडण्यात येईल. सकाळची वेळ असल्यानं त्यावेळी तिथं फारशी वर्दळ नव्हती. तसंही सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचं कामकाज हे दुपारी 12 ते 3 यावेळेत ऑनलाईन पद्धतीनं सुरू असल्यानं कोर्टात फारच कमी प्रमाणात लोकांची वर्दळ असते. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) मुख्य इमारतीत डागडुजी आणि रंगकाम सुरू असल्यानं त्याकामामुळे हा साप बाहेर पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे ऑनलाईन काम सुरू असल्याने न्यायालयात गर्दी नसल्याने गोंधळ उडाला नाही.   या अगोदर देखील उच्च न्यायालयाच्या परिसरात वन्य जीवांचे दर्शन होते. मागील आठवड्यात एक माकड परिसरात फेरफटका मारताना दिसले होते. 



महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha