मुंबई : मुंबईतील गणपती मंडळं आता बळीराजांच्या डोक्यावरचा भार काहीसा हलका करणार आहेत. गणपती मंडळं शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहेत.
गणेशोत्सवाच्या तोंडावर धर्मादाय आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. वर्षाचे बारा महिने गणपती मंडळांसाठी वेगळा तक्रार निवारण कक्ष उभारण्यात येणार आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि चॅरिटी कमिशनच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला.
तीन हजार 46 सामुदायिक विवाह पार पाडल्यानंतर धर्मादाय आयोगाने ही कल्पना मांडली. एसएससी बोर्डात 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह, धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय
'एखाद्या अभ्यासक्रमाची फी जास्त आहे, म्हणून अनेक विद्यार्थी आपल्या आवडीचं शिक्षणाशी तडजोड करतात. मात्र जर एखाद्या विद्यार्थ्याने मेहनत करुन चांगले गुण मिळवले असतील, तर त्याला हव्या त्या क्षेत्रात करिअर का करायला लागावी? यावर्षी गणपती मंडळं त्यांचा भार सोसतील' असं धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितले.
35 जिल्ह्यांमधून पाच ते दहा विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. एकूण जमा झालेल्या रकमेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला किती मदत मिळणार, याचा निर्णय घेतला जाईल.