Maharashtra Assembly Winter Session : राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईमध्ये होणार आहे.  दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान असणार आहे.  अधिवेशन वाढवायचं किंवा नाही याचाही विचार केला जाईल, असं राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. या हिवाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं असणार आहेत. तर  तारांकीत प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापती यांच्याकडे बैठक होणार आहे, असं परब यांनी सांगितलं. 



अनिल परब म्हणाले की, 24 डिसेंबरला पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवायचं किंवा नाही यावर निर्णय होईल. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्यांनाच अधिवेशनामध्ये प्रवेश मिळणार आहे, असं परब यांनी सांगितलं. 


18 हजार कर्मचारी परत कामावर- अनिल परब
एसटी आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व कोण करतंय याचं आम्हाला घेणं देणं नाही.  आम्हाला कामगारांचा प्रश्न आम्हाला वाटतोय. जे या आंदोलनाची जबाबदारी घेत आहेत त्यांनी होणाऱ्या नुकसानीची ही जबाबदारी घेतली पाहिजे.  समिती गठित केली आहे त्यामुळे काहीच करता येत नाही. काहीजण कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत, असंही परब म्हणाले. पगार वेळेवर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात कामगारांचं नुकसान होत आहे. कोणत्याही नेत्याचं नुकसान होत नाही.  कालपर्यंत 18 हजार कर्मचारी परत कामावर आले आहेत.  एका कर्मचाऱ्याने दगडफेक केली आहे त्याने आपल्या रोजी राटी वरती लाथ मारली आहे.  कडक कारवाई केली जाईल, असंही परब म्हणाले. 


संसदीय कामकाजात सरकारला रस नाही, 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन, देवेंद्र फडणवीसांची नाराजी


कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.  माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 4 ते 5  दिवसांचं तोकडं अधिवेशन होणार आहे. पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार आहे. आमची मागणी होती की अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. संसदीय कामकाजात ठाकरे सरकारला रस नाही, अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून होतो आहे हे स्पष्ट आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


फडणवीस म्हणाले की, 3 दिवस ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन घ्या अशी आमची मागणी आहे. पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची मिटींग होणार आहे.  त्यानंतर पुन्हा अधिवेशन कालावधी निश्चित करु असे सांगितलं आहे. 2 वर्षात एकाही अतारांकित प्रश्न, लक्षवेधीला उत्तर दिलेले नाही. याबाबत मी नाराजी व्यक्त केली आहे.  प्रलंबित अतारंकित प्रश्नांना उत्तरे दिली जातील असे आश्वासन दिलं गेलं आहे.  रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी होईल असे आश्वासन मिळाले आहे, असंही फडणवीस म्हणाले.  फडणवीस म्हणाले की,  अधिवेशन नागपूरलाच झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. जाणिवपूर्वक अधिवेशन नागपूरला घेतले जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण यामागे देण्यात आले आहे, असं फडणवीसांनी म्हटलं.