मुंबई/धुळे : राजस्थानमधील कोटा इथे अडकलेल्या महाराष्ट्रातील 1780 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या 92 बस आज (29 एप्रिल) धुळ्यातून रवाना होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी जवळपास 100 बस धुळ्यातून जातील आणि त्याची अंमलबजावणी येत्या दोन दिवसा केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार आज या बस धुळ्यातून रवाना केल्या जातील.


लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील 1780 विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ते सातत्याने करत होते. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या विद्यार्थ्यांचा विचार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि राज्यस्थान सरकारमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु या विद्यार्थ्यांना कसं परत आणायचं असा प्रश्न होता. त्यावेळी महाराष्ट्राची लालपरी मदतीला धावून आली.


धुळे ते कोटा हा साधारण 650 किमीचा प्रवास आहे. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी कर्मचारी सज्ज झाले आहेत. या एसटी बससोबत एक डेप्युटी कलेक्टर, एसटीचे सहा अधिकारी, एक ब्रेक डाऊन व्हॅन, तसेच दोन ज्यादा बसेस राहणार आहेत.



कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एसटी धावणार 


एसटी नियोजन कसं करणार?


- राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी एसटीनेही नियोजन केलं आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 92 बस धावणार आहेत.


- लांबचा प्रवास असल्याने एका चालकावर ताण येऊ नये यासाठी एका बससाठी दोन चालक राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


- बस मध्यप्रदेश मार्गे कोटाकडे रवाना होणार आहेत.


- कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा टाळता यावा, यासाठी खबरदारी म्हणून एका एसटी बसमध्ये 20 विद्यार्थी बसवले जातील अशी शक्यता आहे.


- कोटा इथून या विद्यार्थ्यांना आणताना आरोग्यविषयक सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन होणार आहे, असं एसटीच्या सूत्रांनी सांगितलं.


Lockdown | दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत : सत्यजीत तांबे


हजारो विद्यार्थी कोटामध्ये अडकले?
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटामध्ये शिकायला गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. त्यावेळीस या विद्यार्थ्यांना 14 एप्रिलपर्यंत इथेच राहा, मग पुढे पाहू, असं तिथल्या शिक्षणसंस्थांनी सांगितलं होतं. यानुसार हे विद्यार्थी तिथेच थांबले. मात्र येत्या 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करत त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी आज राज्य परिवहन मंडळाच्या बस कोट्याला रवाना होणार असून तिथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्याना महाराष्ट्रात आणलं जाईल.


Kota Students | कोटात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बसेस पाठवणार : अनिल परब