मुंबई: संप मिटविण्याऐवजी एसटी प्रशासन संप चिघळवत आहे, असा गंभीर आरोप इंटकचे सरचिणीस मुकेश तिगोटेंनी केला. एवढंच नाही तर सरकारनं जोरजबरदस्ती केली तर आम्ही कुटुंबियांसह राज्यभर जेलभरो आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला. ते एबीपी माझाशी बोलत होते.


राज्यातील विविध आगरातून कर्मचाऱ्यांना हकलवून दिलं जातंय, दमदाटी केली जातेय. सर्क्युलर काढून होमगार्ड्सची भरती करून एसटी काढल्या जात आहेत. कालच्या प्रस्तावानुसार आम्हाला 4 ते 5 हजार वेतन वाढ मिळेल, 12 ते 13 हजार रुपये पगारात आमच्या मूलभूत गरजा भागणार नाहीत.  इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे हीच आग्रहाची विनंती आहे.  मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, चर्चेसाठी बोलावलं तर आम्ही तयार आहोत, असं मुकेश तिगोटे म्हणाले.

दिवाकर रावते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

तीन दिवसांच्या संपानंतर आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संपाबाबत माहिती दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री मध्यस्थी करणार की हातावर हात ठेवून गप्प बसणार हे पाहणं महत्वाचं आहे.

रावतेंविरोधात एसटी कर्मचाऱ्यांचा संताप

तिकडे धुळे शहरातमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या विरोधात अर्धनग्न आंदोल केलंय. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तर कोल्हापुरातही एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाकर रावतेंचं पोस्टर फाडलंय. रावतेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलंय.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली.

खासगी वाहतूकदारांची चंगळ

दरम्यान सध्या एसटीचा संप सुरु असल्यानं खासगी वाहतुकीला फायदा होतोय.प्रवासभाडं दुपटी-तिपटीनं वाढवण्यात आलंय. कोकणतही हीच परिस्थिती पाहायला मिळतेय.

माती लावून अभ्यंगस्नान

तर तिकडे नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उटण्याऐवजी माती लावून अभ्यंग स्नान केलं. हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनानं  राज्यभर विश्रामगृहाचं पाणी, शौचालय, स्वच्छतागृह आणि वीज बंद केली आहे. जे कर्मचाऱी आहेत. त्यांना विश्रामग्रहातून बाहेर काढलं जातंय. त्याचा निषेध म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं. तर दुसरीकडे एसटीच्या संपामुळं नाशिक आगारात अडकून पडलेल्या चालक आणि वाहकांसाठी  दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं. बसस्थानकावर चिवडा फराळ खात या एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली.