Maharashtra Shivsena : शिवसेना आणि  निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol) कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर (Election Commission Of India) होणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरू होणाऱ्या संघर्षा आधीच उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांपाठोपाठ आता इतर राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला (Eknath Shinde Group) पाठिंबा दिला आहे. 


मंगळवारी शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राबाहेरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामध्ये जवळपास 8 राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये शिवसेना मागील काही वर्षांपासून पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. 


निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्हं धनुष्यबाण आपल्याला द्यावे अशी मागणीदेखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी न घेण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी यासह इतर मुद्यांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर सुप्रीम कोर्टात 29 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 


दसरा मेळाव्यावर लक्ष


शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या दसरा मेळाव्यावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिवसेनेच्यावतीने शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केल्यानंतर  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीदेखील मेळाव्यासाठी मैदानाची मागणी करणारा अर्ज महापालिकेला आहे. त्यानंतर महापालिका कोणाला परवानगी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. 


दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहीत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानाची  मागणी केली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगारसेनेच्या मार्फत दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: