Vedant Foxconn Project: वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असताना यावर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. जुलैत महाराष्ट्र सरकारनं कसोशीने प्रयत्न केलेला, असंही ते म्हणाले आहेत. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
अनिल अग्रवाल यांच्या या ट्विटमुळे आताच्या सरकारला दिलासा मिळणार आहे. तसेच सरकारने केलेल्या डाव्यांनाही पाठबळ मिळणार आहे. अनिल अग्रवाल यांनी ट्विटकरून हे स्पष्ट केलं आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गुजरातकडून त्यांना सर्वोत्तम डील मिळाली. जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु होती आणि त्यावेळीच त्यांचा करार निश्चित झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्रात नवीन सरकार आलं. शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आलं.
हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनीही हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून चर्चा करून प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत गुजरात सरकारने त्यांना दिलेली ऑफर आणि सवलत त्यांनी मान्य केली. त्यांनी गुजरामध्ये हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली. आता या वादावर स्वतः अनिल अग्रवाल यांनी ट्विटकरून स्पष्टीकरण दिल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकराने केलेल्या आरोपांना पूर्णविराम मिळू शकतो, असं दिसतंय. आपल्या ट्विटमध्ये अनिल अग्रवाल असं ही म्हणाले आहेत की, महाराष्ट्र हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा राज्य आहे. भविष्यात महाराष्ट्रातही ते इंटिग्रेटेड प्रकल्प आणण्याचं काम करणार आहेत.
काय आहे हा वाद?
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होते की, ''वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.'' यानंतरच हा वाद आणखी वाढला. यावरून शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु झाल्या. त्यानंतर आता अनिल अग्रवाल यांनी यासंबंधित ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं आहे.