Maharashtra Politics Sanjay Raut: फुटलेल्या चाळीस आमदारांची मर्जी सांभाळणे एवढेच काम मुख्यमंत्र्यांकडे दिसते. बाकी राज्यात नव्या ‘बाजीरावी’चेच चित्र दिसत असल्याची बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे व ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला. भाजपमधील (BJP) एका मोठ्या गटाचे भांडण हे शिवसेना ठाकरे गटाशी राहणार नसून ते शिंदे आणि त्यांच्या गटासोबत निर्माण होणार असल्याचे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'तील रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील 40 आमदार, कुटुंबीय आसाममधील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या यात्रेच्या निमित्ताने राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रेत त्यांच्या गटाचे चाळीस आमदारही होते व ते सर्व नवस फेडण्यासाठी आसामला गेले. नवस फेडण्यासाठी या सर्व लोकांनी प्राण्यांचे बळी दिले व त्याचे समर्थन महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सदस्य करतात हे राज्याच्या परंपरेला साजेसे नाही. अंधश्रद्धेविरुद्ध बुलंद काम करणारे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, जोतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांशी बेइमानी करणारे हे कृत्य आहे. ईश्वरावर श्रद्धा हवीच, पण त्या श्रद्धेचे अवडंबर किती माजवायचे व सत्ता कायम राहावी म्हणून ईश्वरास ‘बळी’ चढवून लाच का द्यावी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देव सत्य, सर्वज्ञ आणि शक्तिमान आहे.’’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांच्या गटाच्या आमदारांना याचा विसर पडलेला दिसतो. इंदिरा गांधी या सगळय़ात जास्त धार्मिक होत्या, तरीही ईश्वर त्यांचा पराभव रोखू शकला नाही. इथे तर चाळीस आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली असल्याचे राऊत यांनी म्हटले.
मुख्यमंत्री हतबल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हतबल असल्याचा आरोप राऊत यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे आणि ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत असल्याची टीका राऊत यांनी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते मानायला तयार नाहीत. शिंदे यांना दिल्लीनेच खुर्चीवर बसवले व त्यासाठी त्यांच्याच पक्षाने फडणवीस यांचे पंख कापले, पण त्यात महाराष्ट्राचे नेमके काय भले झाले? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. भाजपचे मंत्री मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना मानायला तयार नाहीत. यापुढे भाजपच्या मोठय़ा गटाचे भांडण शिवसेनेशी राहणार नसून ते शिंदे व त्यांच्या गटाशी राहील व त्याच अंतर्विरोधातून सध्याची व्यवस्था कोलमडून पडेल असा दावाही त्यांनी केला.
...तर अमित शाहदेखील वाचवू शकणार नाहीत
कर्नाटकात आज भाजपचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे, पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही व भाजपचे महाराष्ट्रातील लोक शिंदे यांची मजा पाहत आहेत. शिंदे यांना फार लोकप्रियता व यश लाभू द्यायचे नाही असे एकंदरीत धोरण असल्याचा दावा राऊत यांनी केला. चाळीस आमदारांना जपायचे एवढेच मुख्यमंत्र्यांचे काम आहे. मंत्रालयात पैशांच्या मोठय़ा उलाढाली सुरू आहेत. त्या उलाढाली एक दिवस अंगलट येतील व सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत, असे भाजपवालेच सांगतात. कामाख्या देवीचे नवसही अशा वेळी कामी येणार नाही असेही राऊत यांनी म्हटले.
महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार?
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना गंभीर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयात गर्दी असते आणि ते त्या गर्दीत जाऊन लोकांच्या कागदावर सह्या करतात. याचे कौतुक त्यांचेच लोक करतात, पण मुख्यमंत्र्यांनी सह्या केलेल्या त्या कागदाचे पुढे काय होते हेसुद्धा समजून घेतले पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले. शिंदे गटातील चाळीस आमदारांना महाराष्ट्रातील रस्ते, बांधकाम, पालिकेचे ठेके हवे आहेत. ते मिळत आहेत. गेल्या तीन महिन्यांत मुंबई-ठाणे महानगरपालिकेत नेमके काय व्यवहार झाले व मलई कोठे गेली व ती किती हजार कोटींची होती? याचे स्वतंत्र ऑडिट व्हायला हवे अशी मागणीदेखील राऊत यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या घरातूनच हे सर्व आदेश दिले जातात, हे खरे मानले तर उपमुख्यमंत्री फडणवीस हे सर्व ओझे कसे पेलणार? हा प्रश्न असल्याचेही राऊत यांनी म्हटले.