Maharashtra Politics : शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी भेट घेतली. तर, अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केल्याने ही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे घोले यांनी स्पष्ट केले आहे.


शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी सोमवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचं दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राजकीय चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीनंतर किर्तीकर हे देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यास शिवसेनेला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेला दुहेरी धक्का ?


गजानन किर्तीकर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेची महत्त्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाऊ शकते. त्याचा मोठा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. त्याशिवाय, गजानन किर्तीकर हे जुन्या पिढीतील शिवसैनिक आहेत. तेदेखील शिंदे यांच्यासोबत गेल्यास जुन्या शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वातावरण निर्माण होऊ शकते.


किर्तीकर हे पक्षाच्या नेतेपदी असल्याने शिवसेना कार्यकारणीत फूट पडली असल्याचे समोर येईल. त्याचा फायदा शिंदे गटाला निवडणूक आयोगासमोरील आपलाच पक्ष खरा असल्याचे सिद्ध करण्यास होऊ शकतो, असे जाणकार सांगतात. 


अमोल घोले यांचे स्पष्टीकरण 


अमेय घोले हे मुंबईतील वडाळा भागातील नगरसेवक आहेत. अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. युवा सेनेच्या कोअर टीममध्येदेखील घोले यांचा समावेश आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्या संपर्कात घोले असल्याची चर्चा सुरू आहे. 


याबाबत अमेय घोले यांनी सांगितले की, मी पदाधिकारी असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भेटीसाठी आले होते. राज्यातील राजकीय संस्कृतीचा भाग म्हणून मी त्यांचे स्वागत केले असल्याचे घोले यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास असून मी शिवसेनेतच असल्याचे घोले यांनी स्पष्ट केले.