Sanjay Raut : सुप्रीम कोर्ट देणार असलेला निकाल हा शिंदे सरकारबाबत नसून देशाच्या लोकशाहीबाबत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.  या देशात लोकशाही आहे की नाही याचा निर्णय आज होईल, असेही राऊत यांनी म्हटले. 


शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने लागणार आहे, आमच्या खिशात सुप्रीम कोर्ट आहे,  अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. देशातील न्यायव्यवस्था त्यांची गुलाम आहे का असा सवाल त्यांनी केला. न्याय व्यवस्था कोणाची बटीक राहू शकत नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही राऊत यांनी सांगितले. 


सुप्रीम कोर्टात, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे.  राजभवनाचा वापर करून सरकार बनवण्यात आले. देशात कायदा आणि सुव्यवस्था आहे की त्याची हत्या झाली आहे? हे जाणून घेण्यासाठी देशातील जनतेचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागले असल्याचे राऊत यांनी म्हटले. हे सरकार थोपवण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे लादले गेले आहे. संविधानानुसार हे सरकार स्थापन करण्यात आले नाही. सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोपही त्यांनी केला. गोव्यातील घटना हेच दर्शवत असल्याचेही राऊत यांनी सांगितले. 


शिवसैनिक आमच्यासोबत


शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. या निष्ठा यात्रेत तळागाळातील शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवसैनिक शिवसैनिकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेबाहेर कोणी जात असतील तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये असेही राऊत यांनी म्हटले. 


दरम्यान आज महाराष्ट्रातील सत्तांतराबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याचं बोललं जात आहे.  सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज कोर्टात विनंती करणार असल्याची माहिती आहे. या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेना सरन्यायाधीशांकडे सुनावणीसाठी अर्ज करू शकते.