Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हं दिसू लागली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची पैठणी, खाद्य संस्कृती आहे. तसा कोल्हापूरचा जोडादेखील प्रसिद्ध आहे. तोच कोल्हापूरचा जोडा राज्यपालांना दाखवण्याची वेळ आली असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी हिंदूंमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपालपदाची शान घालवली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी दिली. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या टीका करताना म्हटले की, राज्यपाल पद हे मानाच पद असतं. त्या पदाचा मान राखणे हे त्या पदावरील व्यक्तीचे काम आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी याआधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. आता मुंबईबाबत असे वक्तव्य केले आहे.  महाराष्ट्राच्या नशिबी  अशी लोक का आली असा सवाल उद्धव यांनी केला. कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही उद्धव यांनी केली.


कोल्हापूरचा जोडा दाखवा


महाराष्ट्रात अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत, गड-किल्ले आहेत, पैठणीदेखील आहे. कोल्हापुरचा जोडादेखील प्रसिद्ध आहे. आता राज्यपालपदावर बसलेल्या व्यक्तीला कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची वेळ आहे. सामान्य माणसाने कष्टातून कोल्हापुरी जोडा कसा प्रसिद्ध केला, हे दाखवण्यासाठी त्यांना हा जोडा दाखवावा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे अनावधानाने आले नसल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यपालपदी असलेले कोश्यारी काही ठिकाणी खूपच सक्रिय असतात. तर, काही वेळेस अजगरासारखे सुस्त असतात अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यपालांनी रखडवलेल्या 12 आमदारांच्या यादीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्यासाठी अनुत्सुकता दाखवली. राज्यपाल नियुक्त सदस्य नको असतील तर त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते. 


हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न 


कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई, ठाण्यासह राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यांनी भाषिकांमध्ये, हिंदू म्हणून एकवटलेल्या नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. राष्ट्रपतींचे दूत असलेल्या राज्यपालांनी सर्वांना समान वागणूक देणे अपेक्षित आहे. कोश्यारी यांनी आग लावण्याचे काम केले आहे. त्यांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे.