Dasara Melava:  दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटाच्या आमदारांची आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानाबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचे का, याबाबतही चर्चा होणार असल्याचे समजते. तर, दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसी मैदानावर सभेची (BKC Ground) तयारी सुरू केली आहे. 


शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या पारंपरीक दसरा मेळावा घेण्याचीही घोषणा करण्यात आली. दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानावर दावा केला होता. मैदानाचा वाद हायकोर्टात गेल्यानंतर शिवसेनेला या मेळाव्यासाठी परवानगी मिळाली. तर, शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल येण्याआधीच शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. 


सुप्रीम कोर्टात धाव घेणार?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत शिंदे गटातील मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या जिल्ह्यातील आमदार हजर राहणार आहेत. या बैठकीत दसरा मेळाव्याबाबत पुढील रणनिती ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचे का, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, या मेळाव्यासाठी मोठी गर्दी जमवण्यासाठीची रणनिती ठरवण्यात येणार आहे. 


बीकेसी मैदानावर तयारी सुरू 


वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिंदे गटाने सभेची तयारी सुरू केली आहे. जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार नसल्याची चर्चा आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने बीकेसी मैदानासाठी एमएमआरडीएकडे आधी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिवाजी पार्क मैदानासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला. हायकोर्टात सुनावणी होण्याआधीच एमएमआरडीएने शिंदे गटाला मेळाव्यासाठी मैदान दिले. तर, मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. महापालिकेच्या या निर्णयाला शिवसेनेने हायकोर्टात आव्हान दिले होते. 


शिवसैनिकांचा जल्लोष 


दरम्यान, शुक्रवारी हायकोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला परवानगी दिली. हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर मुंबई, ठाण्यासह राज्यात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: