Ajit Pawar : नवीन सरकार राज्यात आल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अनेक चर्चा सुरू आहेत. राज्यात महिनाभरानंतरही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने आता राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Assembly Session) पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यावरी अजित पवार यांनी नाराजी व्यक्त सरकारवर टीका केली. 


मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूरग्रस्त परिस्थितीवरून आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. सध्या सरकार काढत असलेल्या जीआरची आकडेवारी समोर येत आहे. मात्र, प्रत्यक्षात ही आकडेवारी असण्याची शक्यता मला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अनेक फाइल्स स्वाक्षरी न झाल्याने पेडिंग आहेत. अनेक सगळी खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत. ग्रामीण भागाकडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याची टीका पवार यांनी केली. नव्या सरकारचा  शपथविधी होऊन एक महिना झाला. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. कदाचित त्यांची अडचण झालेली असावी. अनेकांना मंत्रीपदाची आश्वासनं दिली मात्र ती पूर्ण होत नसल्यामुळे अडचण होत असावी असेही पवार यांनी म्हटले. 


उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच नाही


शपथविधी होऊन एक महिना झाला मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. अजूनही उपमुख्यमंत्र्यांना सह्यांचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. बऱ्याच फाईल अजूनही थांबलेल्या आहेत. त्यामुळे अनेक काम थांबली असून जनतेची कामे खोळंबली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.  


विधीमंडळ अधिवेशन कधी?


सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सोमवारी आम्ही विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना सोयीस्कर असलेल्या कालावधीत अधिवेशन घेण्याची विनंती केली. मात्र, सध्या केवळ तारीख पे तारीख सुरू असल्याची टीका अजित पवार यांनी केली.