Andheri East Bypoll Election 2022 : सध्या राज्याच्या राजकारणात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची (Andheri East Bypoll Election) रणधुमाळी दिसून येत आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलं असून प्रत्येक पक्षानं आपापली कंबर कसली आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळं शिवसेनेच्या दृष्टीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणातील बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
शिवेसेनेतील दोन गट ठाकरे समर्थक असलेला शिवसेना : 'उद्धव बाळासाहेब ठाकरे गट' आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' असलेला शिंदे गट. हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शिवसेनेतील बंडाचा प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.
निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबरपासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : 7 ऑक्टोबर 2022
नामनिर्देशन पत्रं सादर करण्याची अखेरची तारीख : 14 ऑक्टोबर 2022
नामनिर्देशन पत्रांची छाननी : 15 ऑक्टोबर 2022
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2022
मतदानाचा तारीख : 3 नोव्हेंबर 2022
मतमोजणीचा तारीख : 6 नोव्हेंबर 2022
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा तारीख : 8 नोव्हेंबर 2022
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 1 जानेवारी 2022 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे.
पोटनिवडणुकीत भाजप-शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) युती
अंधेरी पूर्व मतदार संघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) असा सामना रंगणार आहे. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपनं आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर शिंदे गटानं इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपनं आपल्याकडे घेतल्यानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :