मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील केसरबाई नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून, यात 40 ते 45 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलिस, एनडीआरएफ,अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.


दुर्घटनाग्रस्त इमारतीचा आजूबाजूचा भाग चिंचोळा आहे. या चिंचोळ्या गल्ल्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. अशातच दुर्घटनास्थळी नेत्यांची भाऊगर्दी पाहायला मिळाली आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची स्टंटबाजी सुरु झाली आहे. नेत्यांच्या या भाऊगर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.

आत्तापर्यंत दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भाजपचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. तसेच काँग्रेसचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार, नसिम खान, भाई जगताप तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, सचिन अहिर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. नेत्यांच्या या भेटींवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Mumbai Building Collapse | 100 वर्षे जुनी इमारत कोसळली : मुख्यमंत्री | मुंबई | ABP Majha



आज सकाळी साडेअकराच्या सुमारास या इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीत 10 ते 15 कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत दोन लहान मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे.

मुंबईतल्या 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु दाटीवाटीचा परिसर आणि चंचोळ्या गल्ल्या यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मानवी साखळी करुन दगड बाहेर काढले जात आहेत. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचं आव्हान अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिसांसमोर आहे. या दुर्घटनेनंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

VIDEO | मरणाची मुंबई, आत्तापर्यंत मुंबईत 30 दिवसांत 43 मृत्यू | ABP Majha