Maharashtra Political Crisis : "आज जे सगळ्यात पुढे येऊन बोलत आहेत, ते आधी राष्ट्रवादीतच होते. दीपकभाऊ किती वर्ष राष्ट्रवादीत होते, आपला उदय युवकमध्ये होता. अशी किती उदाहरणे देऊ जे आज पुढे येऊन बोलतात ते सगळे राष्ट्रवादीतच होते. पण आम्ही त्या नात्यात कधीच कटूता आणून दिली नाही. जरी ते पक्ष सोडून गेले असतील तरी आमच्या मनात त्यांच्यासाठी प्रेमाच्याच भावना राहतील," असं राष्ट्रवादी काँगेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं भावनिक आवाहन, बंडखोर आमदारांची राष्ट्रवादीवर टीका, सरकारने काढलेले जीआर, यावर भाष्य केलं. त्यावेळी राष्ट्रवादीमुळे शिवसेनेत फूट पडते असा आरोप बंडखोर आमदार करतात, या प्रश्नाला उत्तर देताना वरील भावना बोलून दाखवल्या.


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "गंमत मला याच गोष्टीची वाटते की जे सगळ्यात पुढे येऊन बोलतात ते राष्ट्रवादीतच आधी होते हे आपल्याला विसरुन चालणार नाही. दीपकभाऊ किती वर्ष राष्ट्रवादीत होते, आपला उदय युवकमध्ये होता. अशी किती उदाहरणे देऊ जे आज पुढे येऊन बोलतात ते सगळे राष्ट्रवादीतच होते. पण आम्ही त्या नात्यात कधीच कटूता आणून दिली नाही. जरी ते पक्ष सोडून गेले असतील तरी आमच्या मनात त्यांच्यासाठी प्रेमाच्याच भावना राहतील. कारण माझं स्वत:चं मत आहे की, नेत्याच्या आणि वडिलांच्या आयुष्यात एका माणून दोन मिनिटांचाही आनंदाचा क्षण देऊन गेला असेल तरी मी कधीही त्या व्यक्तींच्या विरोधात बोलणार नाही. कारण मला माझ्या आईची आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव आहे की ज्या नात्यामध्ये आपण कधीतरी एकत्र एका ताटात जेवलो असू त्या मिठाला जागायची सवय, ही माझी स्वत:ची संस्कृती आहे हेच मला छत्रपतींनी शिकवलंय. त्यामुळे वेदना एकाच गोष्टीची होती जे लोक अनेक वर्षे राष्ट्रवादीत होते, त्यानंतर ते सेनेत गेले. तरी आम्ही त्यांचा नेहमी मानसन्मानच केला आणि प्रेमाचंच नातं ठेवलं.


मुख्यमंत्री असावा तर उद्धवजींसारखा : सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुवाहाटीमध्ये असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं. याविषयी सु्प्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री असावा तर उद्धवजींसारखा असावा. मला आज आवर्जून माँ आणि बाळासाहेबांची आठवण येते. कारण माँमधील संवेदनशीलता सातत्याने उद्धवींजीच्या सगळ्या कृती आणि वागण्यामध्ये दिसते. बाळासाहेबांनी सगळ्यांनाच प्रेम दिलं, त्यात मीही एक आहे. माझ्या लहानपणापासून त्यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. बाळासाहेब हयात असताना त्यांनी स्वत: उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची जबाबदारी दिली. आज खूप प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नात्याने उद्धवजी आवाहन करत आहेत. त्यांचं आवाहन भावनिक आहे, जे खरं आहे. राजकारणात यश अपयश, चढ-उतार येत राहतात. शेवटी माणसं आणि त्या नात्यांचा ओलावा हाच टिकतो."


भांड्याला भांडं लागलं की कुरबुरी होतात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदार येतील का? या प्रश्नवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी अॅट्रॉलॉजर नाही पण मला असं वाटतं की कुठल्याही कुटुंबात भांड्याला भांडं लागलं की कुरबुरी होतात, एखाद्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी रुसून गेली तर आई-वडील ते सर्व पोटात घेऊन तो प्रश्न सोडवतात."


उद्धव ठाकरेंना भेटते तेव्हा मला माँची आठवण येते
"माझ्या मते, शिवसेना ही माननीय बाळासाहेब आणि माँ यांनी मिळून स्थापन केली आहे. प्रत्येक कार्यक्रमात माँ त्यांच्यासोबत असायच्या. जेव्हा मी उद्धव ठाकरेंना भेटते तेव्हा कायम माँ यांची आठवण येते. त्यांचा स्वभाव, त्यांचं राहणीमान अगदी माँसारखं आहे. हा पक्ष कायम कुटुंबासारखा राहिलेला आहे आणि यापुढेही राहिल," असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.


सत्ता येते जाते, नाती राहतात
उद्धव ठाकरे समोरासमोर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "ठाकरे कुटुंबियांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सत्ता येते जाते, नाती राहतात. उद्धव ठाकरे यांनी आज जे आवाहन केलं आहे ते मोठ्या भावाप्रमाणे केलं आहे. माँ आणि बाळासाहेब यांनी स्वत: उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं आहे. मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरे जे आवाहन करत आहेत. आमदारांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी घरात येऊन मांडाव्यात. जर ते आमदार घरी आले आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली तर काही ना काही तोडगा जरुर निघू शकतो. संवाद बंद झाल्यावर देश आणि जगातील कोणता प्रश्न सुटलेला आहे? उद्धव ठाकरे सातत्याने संवादासाठी तयार आहेत. त्यासाठी ते आमनेसामने बसण्यासाठी तयार आहेत. 


बंडखोर आमदार राष्ट्रवादीवर टीका करतात
निधी वाटपावरुन बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीबाबत टीका केली आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. कोणत्या तरी चॅनल आणि वर्तमानपत्रामध्ये कोणाकोणाला किती निधी आलाय हे स्पष्ट झालेलंच आहे. त्यावर मला आणखी वेगळं बोलायची गरज नाही." 


GR काढून सरकार चांगलं काम करत असेल तर कौतुक करायला हवं
सरकारने घाईघाईने जारी केलेल्या जीआरबाबत राज्यपालांनी तपशील मागवला आहे, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जीआर हा मायबाप जनतेसाठी असतो, कोणाचा वैयक्तिक लाभ नसतो.  एवढे जीआर काढले म्हणून तुम्ही कौतक करायला हवं. सर्वसामान्य माणूस, शोषित, पीडित, वंचित, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी तर सरकार असतं. जनतेची सेवा करणं हे सरकारचं काम असतं. सरकार जर जीआर काढून चांगलं काम करत असेल तर तुम्ही कौतुक केलं पाहिजे की, वॉव व्हॉट अ गव्हर्नमेंट.