Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही शिवसेनेवर घाव सुरु झाले आहेत. मनसेनं पोस्टर लावून शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यात शिवसेनेकडे बोट दाखवत "आता कसं वाटतंय", असा सवाल केला आहे. मनसेचे हे पोस्टर मुंबईतील साकीनाका परिसरात लावण्यात आले आहे. अजान वादातही राज ठाकरे उघडपणे उद्धव ठाकरे सरकारसमोर उभे ठाकले होते. त्यांनी सर्व मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता.
अलीकडच्या काळात अनेक मुद्द्यांवरून शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. यात अजान वादाचा मुद्दा सर्वात ठळक राहिला.
एक काळ असा होता की राज ठाकरेंकडे शिवसेनेचे भावी नेते म्हणून पाहिले जायचे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक चमकता तारा होते. लोकांना त्यांच्यामध्ये बाळ ठाकरेंची प्रतिमा दिसायची. त्यामुळे ते शिवसैनिकांच्या पसंतीस उतरले. मात्र, शिवसेनेला उत्तराधिकारी म्हणून बाळासाहेबांनी उद्धव यांना प्राधान्य दिले.
त्यानंतर झालेल्या अनेक घडामोडीनंतर राज यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले. जानेवारी 2006 मध्ये शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मार्च 2006 मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) असे नाव दिले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक शिवसेना समर्थकही गेले होते.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्या पायाखालची जमीनच सरकवली आहे. सर्व पर्यायांचा वापर करूनही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना ते आपल्या छावणीत आणू शकलेले नाहीत.
शिंदे यांच्या तुलनेत ते संख्याबळात पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सरकारच्या भवितव्याबाबत अटकळ सुरू झाली आहे.