Maharashtra Political Crisis : 36 दिवसात बनलेले तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार. अडीच वर्ष चाललं आणि 9 दिवसात कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. भाजपच्या गोटात जल्लोष सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवून भाजपनं जल्लोष केला. बहुमत चाचणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मविआला धक्का दिला आणि बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. विरोधात निकाल गेल्यानं उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं जनतेला सांगितलं. फक्त इतकंच नाही तर त्यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आता शिवसेनेचीच धुरा हाती घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान आज आमदारांच्या मार्गात येऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय. उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतर भाजपचे सर्व नेते, आमदार हॉटेल ताज प्रेसिडेन्सीत असून जोरदार सेलिब्रेशन झालं.


भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक, बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. आज विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील एक दोन दिवसात सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. 


राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षात कालचा दिवस निर्णायक ठरला. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: राजभवनात जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. 


शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद


भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागदे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीप पद दिले जाऊ शकते. मात्र, खाते वाटपाचे हे सूत्र अंतिम झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28  मंत्रीपदे मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती समोर येत आहे