Maharashtra Politics Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.  शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. 


शिंदे गटाने  शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 


खासदारांमध्येही उद्याच फूट पडण्याची शक्यता


शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नेमणूक केली जाणार असून प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना उद्याच ( 19 जुलै रोजी) पत्र दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेत बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्री एकनिष्ठ असल्याचे दिसत आहे. 


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या काही खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली होती. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. 


खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिंदे गटात सामिल होत असल्याचे जाहीर करताना अनेकजण शक्तिप्रदर्शन करत आहेत.