मुंबई : शनिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'गुप्त' भेट घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसने (Congress) यावर भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये यावर शिवसेना आणि काँग्रेसचे एकमत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काही निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात आज मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीस आदित्य ठाकरे, संजय राऊतही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी म्हटले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीवर आज चर्चा झाली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये तीन तास चर्चा झाली. कालपासून, जी राजकीय  चर्चा सुरू आहे त्यावर गांभीर्याने चर्चा झाली. संभ्रमावस्था चिंताजनक आहे. ही संभ्रमावस्था ताबडतोब संपवायला हवी. एकत्र बसून काही निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शरद पवारांच्या भूमिकेवर संभ्रम फार काळ राहता कामा नये यावर आमचं एकमत असल्याचेही त्यांनी म्हटले.  फार काळ संभ्रम राहिल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, यावर आमचं एकमत आहे. लोकांमध्ये प्रश्न आहेत ते आम्हाला चिंतीत करतात. त्यावर चर्चा झाली लवकर भ्रम दूर झाला पाहिजे. यावर एकमत झालं आहे. लवकरच शरद पवार यांच्याशी बोलणी करू असेही राऊत यांनी सांगितले. 


पवारांनी कठोर निर्णय घ्यावेत 


शरद पवार मोठे नेते आहेत.  जे कोणी भाजपसोबत गेले आहेत, ते जरी जवळचे  नातेवाईक असतील तरी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आम्हीदेखील कठोर निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम आघाडीवर होतोय लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. लोक आम्हाला प्रश्न विचारतात पण आमच्याकडे उत्तरे नाहीत. म्हणून नाना पटोले आले आणि त्यांनी चिंता व्यक्त केली असल्याचेही राऊत यांनी सांगितले.


संभ्रम निर्माण होता कामा नये


संभ्रम निर्माण होऊ नये याची काळजी आम्ही शिवसेना, काँग्रेस घेत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. आमच्याकडे लोक एकत्र बघतात कोणताही संभ्रम होऊ नये अशी आमची धारणा आहे. आम्हाला या विषयाची चिंता आहे. कारण जनतेत संभ्रम निर्माण होतोय यावर लवकर भूमिका स्पष्ट झाली पाहिजे अशी भूमिकाही पटोले यांनी व्यक्त केली. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक आहे. त्याबद्दल चर्चा झाली असल्याचे पटोले यांनी म्हटले. 


Sanjay Raut On Sharad Pawar And Ajit Pawar :पवारांच्या भेटीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली- संजय राऊत