Shivsena On Amit Shah Speech: मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला आज शिवसेनेने मुखपत्र सामनातील 'रोखठोक' सदरातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच त्यांना एका प्रकरणात जामीन मिळाला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेने केला आहे. या प्रकरणावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलतील असेही या 'रोखठोक' सदरात नमूद करण्यात आले. 


अमित शाह यांनी गणेशोत्सवात लालबाग राजा आणि इतर नेत्यांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने  भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईतील राजकारणावर भाजपचे वर्चस्व असावे आणि उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार शिवसेनेने दैनिक सामनातील 'रोखठोक' सदरात घेतला आहे. अमित शाह यांनी केलेले भाषण हे कृतघ्नतेचे टोक असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. 


शाह आणि भाजपचा भयंकर चेहरा उघड


अमित शाह व भाजपचे ‘मिशन मुंबई’ काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला असल्याचे शिवसेनेने म्हटले. अमित शाह व त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची भाषणे पुन्हा पु्न्हा करीत राहिली पाहिजेत. त्यातूनच जनमनाचा उद्रेक होईल असे शिवसेनेने नमूद केले. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळविण्याचे ठरवले असल्याचा दावा लेखात करण्यात आला आहे. 2014 साली शिवसेनेने दोन जागांवरून भाजपशी असलेली युती तोडली असा ठपका शहा ठेवतात. मग 25 वर्षांची दोस्ती टिकविण्यासाठी भाजप दोन पावले (जागा) मागे का गेली नाही? असा सवालही शिवसेनेने केला. 


शिंदे तर अमित शाहांचे हस्तक!


शिवसेनेने बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. 2014नंतर अमित शाह यांनी शिवसेना व ठाकरे यांच्यावर अनेक विखारी हल्ले केले. ‘शिवसेना को पटक देंगे’ अशी भाषा वापरली, पण एकनाथ शिंदे यांनी त्या वक्तव्याचा साधा निषेधही केला नव्हता, याचेही स्मरण शिवसेनेने करून दिले.  शिवसेनेचे अनेक नेते व प्रवक्ते ‘पटक देंगे’वर तुटून पडले होते तेव्हा शिंदे यांचा स्वाभिमान, अभिमान, हिंदुत्व बर्फाच्या गोळय़ाप्रमाणे विरघळून गेला असल्याचा टोला लगावला. तेव्हाही अमित शहा शिवसेना गाडायला निघाले होते व आजही त्यांचे तेच स्वप्न आहे. दोन्ही वेळेस शिंदे हे अमितभाईंचे हस्तक म्हणूनच काम करीत होते आणि स्वतःची कातडी वाचवत होते असेच दिसत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. अमित शाह यांच्या महाराष्ट्रद्रोही वक्तव्यावरच शिंदे गटात बंड व्हायला हवे, पण लाचार आणि बेइमानांकडून स्वाभिमानाची अपेक्षा कशी करायची? अस सवाल शिवसेनेने शिंदे गटाला केला आहे.


मोदी-पवारांतील सुसंवादामुळे जामीन


अमित शाह यांच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष असल्याचे शिवसेनेने म्हटले. शाह यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे असे सांगताना शिवसेनेने मोठा गौप्यस्फोट केला आहे.  केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शाह यांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य असल्याचे 'सामना'ने म्हटले. आणखी एका प्रकरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सरकार’ पद्धतीने भूमिका करून अमित शाह यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली. या दोन्ही प्रसंगांवर स्वतंत्र लिखाण संजय राऊतच करू शकतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील; पण त्याच ठाकरे-पवारांविरुद्ध टोकाचे मिशन आज अमित शहा व त्यांचे लोक चालवित असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. 


शाह यांनी असेच भाषण करावे 


अमित शाह यांनी सातत्याने विरोधात भाषण करावे असे आवाहन शिवसेनेने केले आहे. अमित शाह मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील ‘मऱ्हाठे’ त्यावर टाळ्या वाजवतात. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र अमित शाह यांनी शिवसेना गाडण्याची व ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे.त्यातूनच नव्या दमाचे वीर, योद्धे निर्माण होतील असे शिवसेनेने म्हटले. स्वतःस शिंदे गट म्हणवून घेणाऱ्यांनी तर स्वाभिमानाची सुंताच करून घेतल्याने ते निद्रिस्त असल्याची विखारी टीका शिवसेनेने केली आहे.