Maharashtra Mumbai Rain Updates: राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. मुंबईतही (Mumbai Rain Update) पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अचानक कोसळणाऱ्या अवकाळीच्या सरींमुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. राज्यभरात झालेल्या अवकाळीमुळे 25 जिल्ह्यांतील एक लाख 39 हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं आहे.
मुंबईसह ठाणे, कल्याणमध्येही पावसाची हजेरी
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर या सर्व परिसरामध्ये पाऊस सुरू आहे. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण परिसरात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रब्बी तसेच बागायती शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी या भागातील वीट भट्टी व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजासह विट भट्टी व्यवसायिक ही चिंतेत आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यासह परभणीत (Parbhani) जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच परभणी, अकोला, बुलढाणा, सातारा, धुळे, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातही पाऊस बरसत आहे. सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.
शेती पिकांना फटका
सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरू आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे.