Maharashtra Mumbai Rain Updates : राज्यभरात पावसानं (Rain Updates) धुमाकूळ घातला असला तरी मुंबईत मात्र कालपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. पण काही काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुंबईला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. पण, आठवड्याच्या शेवटी मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे. गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांतील पाणी पातळी वाढली असून मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची पातळी आता आवश्यकतेच्या 82 टक्के इतकी आहे, तर तीन तलावही ओसंडून वाहत आहेत.


मुंबईतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता 


रविवारी मुंबईत फारसा पाऊस झाला नाही. काही भागांत रिमझिम सरी बरसल्या. मात्र, भारतीय हवामान विभागानं (IMD) शहरासाठी सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच, आज मुंबईच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


जुलैमध्ये मुसळधार पाऊस 


महत्त्वाचं म्हणजे, गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं शहराची जुलै महिन्यातील सरासरी 855 मिमी पूर्ण झाली आहे. IMD कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांनी नोंदवलेला एकूण पाऊस आता अनुक्रमे 1,204 मिमी आणि 1,427 मिमी आहे. जो दोन्ही वेधशाळांसाठी सामान्यपेक्षा जास्त आहे. 


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीत वाढ 


रविवारी मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या सात तलावांमध्ये क्युमुलेटिव स्टॉक 11.88 लाख मिलियन लिटर (82%) होतं. मुंबईला कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाणीपुरवठा होण्यासाठी 1 ऑक्टोबरपर्यंत तलावांमध्ये 14.47 लाख मिलियन लिटर पाणी असणं आवश्यक आहे. सध्या शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये यंदाचा एकूण पाणीसाठा गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त आहे. 2021 मध्ये, एकूण पाणीसाठा 2.26 लाख दशलक्ष लिटर किंवा आवश्यक प्रमाणाच्या फक्त 18 टक्के इतका होता, तर 2020 मध्ये तो 26 टक्के होता. 


राज्यात पावसाचं धुमशान सुरुच


राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून  गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Rain LIVE : राज्यात पावसाचं धुमशान सुरुच, पाहा ठिकठिकाणचं अपडेट्स एका क्लिकवर