No Honking Day 2023 : आज मुंबईत 'नो हॅांकिंग डे' (No Honking Day 2023) ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. पण, नो हॅांकिंग डे म्हणजे नेमकं काय? या दिवशी नेमकं काय केलं जातं? या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का? नसेल, तर ही माहिती जाणून घ्या. 


नो हॅांकिंग डे म्हणजे काय?


'नो हाँकिंग' म्हणजे विनाकारण हॉर्न न वाजविणे तसेच विनाकारण हॉर्न वाजवू नये. अनेकदा आपण मुंबईसारख्या ठिकाणी पाहतो अनेकजण वाहन चालवताना विनाकारण हॉर्न वाजवतात. यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. याच ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजच्या दिवशी जनजागृती केली जाणार आहे. तसेच, वाहतूक पोलीस विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील करणार आहेत. 


केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील नियम क्रमांक 119 आणि 120 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आहेत याची खात्री करण्याचे आवाहन देखील मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं केलं आहे.


सध्या मुंबईतील वाहनांच्या हॉर्नचा आवाज हा 75 डेसीबल आहे. जो ध्वनी प्रदूषणाच्या ठरवून दिलेल्या 85 डेसीबल मर्यादेपेक्षा अधिक आहे. तो कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. 


ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी खास मोहिम


मुंबईत वाहनांची मोठी संख्या आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच ध्वनी प्रदुषण होते. शहराला या समस्येपासून मुक्त करण्यासाठीच ही मोहिम राबवली जात आहे. अनावश्यक हॉर्न वाजविल्याने ध्वनी प्रदुषणात वाढ होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने 'नो हॉकिंग डे' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांमध्ये हॉर्नविषयी जनजागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हॉर्नचा वापर टाळून वाहन चालकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


रस्त्यावरुन जाणाऱ्या महिला, गर्भवती महिला, मुलं यांना या हॉर्नमुळे त्रास होतो. त्याशिवाय मुंबईकरांनीही त्याना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याच्या तक्रारी केल्या असल्याचं समोर आलंय. नीट झोप न लागणं किंवा काहीशी कर्णबधीरता येणं अशा प्रकारच्या तक्रारीही नोंदवल्या गेल्या आहेत.


वाहन चालवणं हा एक आनंद आहे. मात्र, कारणाशिवाय हॉर्न वाजवत राहिल्यास त्याचा इतरांना त्रास होतो. त्यामुळे वाहनं जरुर चालवा, मात्र तुमच्या हॉर्न वाजवल्याने इतरांना त्रास होणार नाही, याची काळजीही घेणं गरजेचं आहे. 


सायलेन्स झोन म्हणजे काय?


सायलेन्स झोन म्हणजे एखादा भाग शांतता क्षेत्र म्हणून राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येतो. त्या क्षेत्रात शांतता क्षेत्राचे नियम लागू केले जातात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवाज केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. रुग्णालयं, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळं आणि न्यायालयं यांच्या 100 मीटरच्या परिसरात सायलेन्स झोनचे नियम मात्र कडक असतात.


9 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट 'नो हॉंकिंग डे'


ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 9 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी बुधवारी मुंबईत वाहतूक पोलिसांकडून नो हॉंकिंग डे पाळण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी मुंबईकर वाहनचालकांना या मोहिमेत सहभागी होत हॉर्न मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेचे पालन न करता विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


No Honking Day : मुंबईत आज 'नो हॉंकींग डे',  नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिस कारवाई करणार