Shiv Sena Anil Parab:  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्यासह अन्य सहाजणांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसंनी वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आज तातडीनं हे अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल केले गेले. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांच्यासमोर 30 जून रोजी सुनावणी पार पडणार आहे.


अनिल परब (Anil Parab) यांचा निकटवर्तीय असलेला माजी नगरसेवक हाजी अलीम शेख, विधानसभा संघटक माजी नगरसेवक सदा परब, उदय दळवी, संतोष कदम या चार जणांना वाकोला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. वाकोला महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंवि कलम 353, 332, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


मागील आठवड्यात वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय पालिकेनं अनधिकृत म्हणून पाडले होतं. त्याच्या निषेधार्थ परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ एच-पूर्व प्रभागाच्या अधिकारी स्वप्ना क्षीरसागर यांना भेटण्यासाठी बीएमसीच्या कार्यालयात पोहोचलं. पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही आमचं पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करणारे अधिकारी कोण होते?, असं परब आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं. तेव्हा काही कर्मचारी पुढे आले असता कार्यकर्त्यांनी बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील (42) यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना धमकी दिली, असा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उल्लेख आहे. 


त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोला पोलिसांकडे याची रितसर तक्रार दाखल केली. त्याआधारे परब यांच्यासह संतोष कदम, सदा परब, उदय दळवी आणि हाजी अलीम खान यांच्यासह अन्य सहाजणांविरूद्ध पालिका अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परब यांच्यासह अन्य सहा आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.


नेमकं काय घडले?


शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वांद्रे पूर्व परिसरातील शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून त्या शाखेच्या बांधकामावर जेसीबी चालवून नुकतीच कारवाई करण्यात आली होती. आता त्या शाखेच्या कारवाईवरूनच मोठा वाद पेटला आहे. शाखेवर तोडक कारवाई करताना त्या शाखेतला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवरायांचा फोटो न काढता हातोडा मारल्यानं ठाकरे गट संतप्त झाला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शाखा पाडण्याच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्याला या प्रकरणात जाब विचारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात घडली. आणि त्यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली. 



Anil Parab Speech Jan Akrosh Morcha : आमच्या शाखेला हात लावणाऱ्या अधिकाऱ्याचा बंदोबस्त करु, थेट इशारा