नवी दिल्ली : मुंबईतलं सिल्वर ओक आणि दिल्लीत 6 जनपथ...ही केवळ बंगल्याची नावं नाहीत..तर याच ठिकाणातून महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाची सगळी स्क्रिप्ट लिहिली गेली आहे. कारण ही निवासस्थानं आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची. विधानसभा निवडणूक निकालानंतर ज्या ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय वळण दिलं, त्या सगळ्यांमध्ये ही दोन नावं कॉमन राहिली आहेत.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल (21 नोव्हेंबर) मुंबईत पवारांना भेटायला सिल्वर ओकवर पोहोचले. शिवसेनेसाठी सगळ्या घडामोडींचं केंद्र म्हणजे मातोश्री. मातोश्रीबाहेर पडून ठाकरे कुणाला भेटायला गेल्याची उदाहरणं फारच विरळा. पण काल शरद पवार दिल्लीतून मुंबईत दाखल झाले आणि पाठोपाठ उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी पवारांच्या या निवासस्थानी पोहोचले.

दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 15 बड्या नेत्यांची सगळी खलबतं झाली 6 जनपथवर. दोन दिवस मॅरेथॉन बैठका पार पडत होत्या. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष याच 6 जनपथकडे केंद्रीत झालं होतं. संजय राऊत-पवारांच्या भेटीगाठी...ज्या भेटीत हे समीकरण जुळवण्याची रणनीती आखली गेली. त्या सगळ्या भेटी कधी सिल्वर ओकवर तर कधी 6 जनपथवर झाल्या.

महाराष्ट्रात सरकार तीन पक्षांचं आलं, मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा झाला तरी हे सरकार मात्र फिरणार आहे शरद पवार या नावाभोवती. कारण मुंबई असो की दिल्ली, प्रत्येक महत्वाची घडामोड पवारांच्या निवासस्थानी होताना दिसत आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून 6 जनपथ हे पवारांचं शासकीय निवासस्थान आहे. 2004 मधे शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री झाले, तेव्हापासून ते या बंगल्यात राहत आहेत. सत्ता असो किंवा नसो हा बंगला कायमच पॉवर सेंटर राहिलाय. अगदी 2014 नंतर जेव्हा राष्ट्रवादीची ना दिल्लीत सत्ता होती ना केंद्रात. तेव्हाही 6 जनपथची शान काही कमी झाली नाही. कारण याही काळात अनेक महत्वाचे नेते, अगदी मंत्र्यांचीही हजेरी या बंगल्यात राहिली. या काळात एकदा महाराष्ट्राशी संबंधित विषयाची शासकीय बैठक करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अधिकाऱ्यांसह 6 जनपथवर पोहोचले होते.

राजकारणासोबतच 6 जनपथ हे क्रिकेटचंही पॉवर सेंटर राहिलं आहे. शरद पवार 2005 ते 2008 या काळात बीसीसीआयचे अध्यक्ष होते, नंतर 2010 ते 2012 या काळात आयसीसीचे अध्यक्ष. 2011 मध्ये भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकल्यानंतर सर्व टीम याच 6 जनपथवर त्यांना भेटायला आली होती.

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी 6 जनपथवर हजेरी लावली आहे. त्या यादीत अनेक कलाकार, साहित्यकार तर आहेतच. पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आपल्या पत्नी हिलरी क्लिंटन यांच्यासह जेव्हा भारत दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी 6 जनपथवर हजेरी लावलेली आहे.

देशात मोदी-शाह या जोडगोळीसमोर अनेक बड्या बड्या नेत्यांनी माना टाकलेल्या असताना, महाराष्ट्रात मात्र शरद पवारांनी लढवय्या बाणा दाखवत भाजपला रोखलं. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एक वेगळा प्रयोग सध्या महाराष्ट्रात घडत आहे आणि त्या सगळ्या केंद्रस्थानी आहे हे 6 जनपथ...