मुंबई : महाविकासआघाडीचं सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरत असताना तिकडे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपात शांतता पसरली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट इथल्या भाजप प्रदेश कार्यालयात सध्या शुकशुकाट आहे. भाजपच्या एकाही नेत्याकडून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं जातं नाही.


महिन्याभरापूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या कार्यालयात जल्लोषाच्या तयारी झाली होती. त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झाली होती. स्टेज बांधला होता. दोन एलईडी लावले होते. परंतु त्याच्या उलट चित्र आज महिन्याभराने पाहायला मिळत आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करता न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. परिणामी पक्ष कार्यालयाबाहेर शांतता पाहायला मिळत आहे.

भाजपच्या कोअर सदस्यांपैकी देवेंद्र फडणवीस अजूनही 'वर्षा'वर घडामोडींवर लक्ष ठेऊन असल्याचं सांगितलं जात आहे. सुधीर मुनगंटीवार खासगी कामात चंद्रपुरात व्यस्त आहेत. गिरीश महाजन नाशिक महापौर निवडणुकीत व्यस्त आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात मुक्काम ठोकला आहे. आशिष शेलार एमसीएच्या टीम मधून कोलकात्याला गेले आहेत. तर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे मुंबईतच असल्याचं कळतं.

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच दिल्ली श्रेष्ठींकडे गेल्यापासून भाजपच्या राज्यातील नेते या सर्व घडामोडींपासून सध्या तरी अलिप्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांच्या हातात सध्या काहीच राहिलं नसून पुढील भूमिकेबाबत वरिष्ठ नेत्यांकडून जोपर्यंत काही संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत भाजपच्या गोठात काहीच हालचालीची शक्यता दिसत नाही.

मुख्यमंत्रीपद शिवसेनेला, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या बैठकीत सत्तावाटपावर चर्चा झाल्याचं कळतं. यानुसार, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मातोश्रीवरील बैठकीत केली. तसंच उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचं कळतं. तर काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरात यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतं.