मुंबई : केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभर या चिमुरड्याचा शुक्रवार (22 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजता दुर्दैवी मृत्यु झाला आहे. 7 नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गादी जळून झालेल्या अपघातात त्याचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे कान आणि हात कापण्याची वेळ आली होती. याबाबतची माहिती केईएम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. नुकतेच या तीन महिन्याच्या मुलाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. यातील पाच लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जाणार होते, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जाणार होते.


मूळच्या उत्तरप्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर यांना अडीच महिन्यांपूर्वीच एक पुत्रप्राप्ती झाली. पण, प्रिन्सची तब्येत सतत खालावलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर, कुटुंबियांना प्रिन्सच्या छातीत छिद्र असल्याचं कळलं. त्यामुळे कुटुंबीय बाळाला घेऊन मुंबईत दाखल झाले. त्यानंतर, उपचारांसाठी ते पालिकेच्या केईएम रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी तपासणी करत बाळाला अॅडमिट करुन घेतलं. मध्यरात्री 2.50 वाजण्याच्या सुमारास बेडच्या बाजूला ऑक्सिजन आणि अन्य वायरमध्ये अचानक आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये बाळाचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला. त्यामुळेच प्रिन्सचा हात कापावा लागला.

रुग्णालयात असणाऱ्या मशीनच्या वायरमध्ये आग लागल्यामुळे आणि बेडवर ठेवलेल्या कागदाच्या गठ्ठ्याला आग लागली. या घटनेनंतर बाळाच्या हाताला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे समोर आले. त्यामुळं रुग्णालय प्रशासनाने बाळाचा हात दंडातून कापला. मात्र, यामध्ये रुग्णालयाचा भोंगळ कारभार स्पष्टपणे दिसत होता. म्हणून बाळाचे वडील पन्नेलाल राजभर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात विद्युत उपकरणांचा सांभाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात अद्याप दोषी कोण हे जरी सिद्ध झालं नसलं तरी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल अशी आशा आहे.

उपचारानंतर आयुष्याची वाटचाल सुंदर व्हावी म्हणूज उत्तरप्रदेशवरुन आलेल्या प्रिन्सच्या नशिबात वेगळाच खेळ मांडला होता. पण यात रुग्णालयाकडून दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.