मुंबई: महाराष्ट्र सरकारला सहा लॉटरी कंपन्यांनी 2007 ते 2009 दरम्यान 933 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. यासंबंधीचं वृत्त मिड-डेनं दिलं असून याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही दुजोरा दिला आहे.


या कंपन्यांनी अवैधरितीने अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मिझोरम आदी राज्यातील ऑनलाईन लॉटरीची राज्यात विक्री केली, पण याचा कर राज्य सरकारकडे जमा केला नाही. यामुळे राज्य सरकारला मोठं नुकसान सहन करावं लागलं.

मुनगंटीवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून या सहा कंपन्यांपैकी स्वागत एजन्सीने 76.22 कोटी, समर्पण ट्रेडिंगने 134. 43 कोटी, कॅम्पलॉट गेमिंग सोल्यूशनने 38 कोटी, ज्यूपिटर गेमिंग 323.14 कोटी, एसएल मार्केटिंगने 133.10 कोटी आणि श्वेता एन्टरप्रायझेसने 228.30 कोटींचा महसूल बुडवला आहे.

दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाने सेवरी पोलीस स्थानकात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्तांनी सांगितलं. तसेच या प्रकरणी लॉटरी ड्रॉ करणाऱ्या सहा कंपन्याना आरोपी बनवण्यात आलं असून यातील कर भरण्यासंदर्भातील तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या कंपन्यांच्या लॉटरी विक्रीला राज्यात बंदी घालण्यात आली असून, कराची वसूली अद्याप झालेली नाही.