मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Maharashtra Mumbai Farmers Protest) समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले होते. त्यानंतर राजभवनाकडे जाताना मोर्चा रोखण्यात आला. तसेच राज्यपाल उपस्थित नसल्याची माहिती आंदोलकांना देण्यात आली. यानंतर संयुक्त मोर्चाने राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा आरोप करत संयुक्त मोर्चाच्या वतीनं राजभवनावर जाण्याचा निर्णय रद्द करत राज्यपालांना देण्यात येणारं निवेदन फाडून टाकण्यात आलं.
मात्र राजभवनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. 25 जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राजभवनातून आधीच स्पष्ट करण्यात आल्याचे आज राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे की, संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना 22 जानेवारी रोजी दुरध्वनीव्दारे तसेच निमंत्रक प्रकाश रेडडी यांना 24 जानेवारी रोजी लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धते बद्दल कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाव्दारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेड्डी यांना या बाबतचे लेखी पत्र दिनांक 24 जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे चुकीचे आहे असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
'राज्यपाल गोव्याला पळाले' म्हणत आंदोलकांनी निवेदन फाडलं! उद्या तिरंग्याला वंदन करुन मोर्चा परतणार
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून 25 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवेदन स्वीकारतील असे देखील धनंजय शिंदे यांना पूर्वीच कळविण्यात आले होते. तसे स्वीकृत असल्याबद्दल त्यांनी संदेशाव्दारे कळविले होते, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.
काय म्हणाले धनंजय शिंदे
याबाबत धनंजय शिंदे म्हणाले की, राजभवनातून राज्यपाल भेटणार नसल्याचा मेसेज काल आला होता. आम्हाला ते भेटणार नाहीत, याबाबत माहिती होती. परंतु आमचं म्हणणे आहे की राज्यात जवळपास 13 ते 14 हजार शेतकरी राज्यपालांना भेटायला येणार होते. याबाबत मागील पंधरा दिवसांपासून याबाबतच्या बातम्या माध्यमांमधून येत होत्या इतकी माहिती असताना देखील राज्यपालांना मोर्चेकऱ्यांनी भेटणं टाळलं आहे. मागील तीन दिवसांपासून थंडीत चालत आलेल्या मोर्चेकऱ्यांना राज्यपालांनी भेटणं आवश्यक होतं. परंतु त्यांनी जाणूनबुजून मोर्चेकऱ्यांना भेटणे टाळलं आहे. सध्याच्या टेक्नॉलॉजीचा जगात राज्यपाल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोर्चे कऱ्यांशी संवाद साधू शकत होते. परंतु त्यांनी हे देखील जाणूनबुजून टाळलं आहे. मागील काही महिने केवळ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून राज्य, देश चालत होता. आज राज्यपालांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांशी संवाद साधणं काहीच आवघड नव्हतं. आज राज्यपालांनी जाणून-बुजून शिष्टमंडळाला भेटणं टाळलं आहे. असा आमचा आरोप आहे, असं शिंदे म्हणाले.
राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ- शरद पवार
राज्यपालांवर आरोप करताना शरद पवार म्हणाले होते की, जो शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्या आहे, हे तुम्ही आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे. तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं, असं शरद पवार म्हणाले.
राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, शरद पवारांचा आरोप
राज्यपालांची कृती महाराष्ट्रातील जनतेचा अपमान
आपली भूमिका स्पष्ट करताना अशोक ढवळे म्हणाले की, राज्यपालांनी स्वत: वेळ दिली होती. त्यांनी स्वत: दिलेल्या भेटीनंतर पळून गेले. गोव्यात राज्यपाल मजा मारायला गेले. राज्यपालांची ही कृती महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. श्रमिक, कष्टकरी, कामगारांचा हा अवमान राज्यपालांनी केला आहे. राज्यपाल भाजपचे पुढारी होते. ते आरएसएसचे प्रचारक अजूनही आहेत, त्यामुळं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा आरोप त्यांनी केला.
राज्यपालांच्या निषेधार्थ निवेदन फाडलं
त्यांनी सांगितलं की, राज्यपाल नाहीत तर ते सचिवांना निवेदन देणार नाहीत असं ठरवलं आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ त्यांना आपण देणार असलेलं निवेदन याच स्टेजवरुन फाडून टाकणार. राज्यपालांच्या या कृतीला निषेध म्हणून हे निवेदन आम्ही फाडत आहोत. हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार आहोत. आपण आज खूप चांगल्या रितीने आंदोलन केलं. आज एकजुटीनं आणि ताकतीनं आपण मोर्चा काढला. उद्या प्रजासत्ताक दिन आहे. हा आपला दिवस आहे. आजचा मोर्चा केंद्र सरकारच्या विरोधातला मोर्चा आहे. अंबानी, अदानीची उत्पादनं वापरु नका. शांततेत आपण आझाद मैदानात जायचं आहे. उद्या 26 जानेवारीला तिरंग्याला वंदन करुन आपण घरी जायचं आहे, असं ढवळे म्हणाले.