मुंबई : राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत.


राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.


आजपर्यंत एकूण 53,39,838 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.46 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.65 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,46,08,985 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,13,215 (16.51 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 20,53,329 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 14,981 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये डॉक्टरांनी औषधांचा अनाठायी वापर टाळावा : मुख्यमंत्री
कोविड उपचारांमध्ये औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा. अतिरेकी औषधांमुळे रुग्णांवर याचे दुष्परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. म्युकरमायकोसीस सारखा आजार याच गोष्टींमुळे होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना या गोष्टींचा ध्यानात ठेवाव्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असली तरी धोका टळलेला नाही. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


आज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेडिकल एज्युकेशन विभागाचे डायरेक्टर डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री कोरोना रुग्णांवर उपचार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.