मुंबई : मुंबईत कडक निर्बंध लागू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. ही बाब लक्षात घेत काळाचौकी येथे असणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठानने पुढाकार घेत पुढील 10 दिवस सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत जेवण उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. 


मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण उपासमार होत असल्यामुळे चालत गावी गेले होते. यामध्ये भुकेमुळे अनेकांचे प्राण देखील गेले होते. हीच बाब लक्षात घेत काळाचौकी येथील स्वराज्य प्रतिष्ठाने पुढाकार घेत आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी दुपारच्या जेवणाची सोय केली आहे. 'भूक म्हणजे काय आम्ही जाणतो' आशा आशयाचं एक पोस्टर तयार करुन त्यांनी ते सोशल मीडियातून व्हायरल केलं आहे. स्वराज्य फाऊंडेशनच्या या उपक्रमाचं सर्वसामान्य नागरिकांकडून प्रचंड कौतुक होतं आहे. 


याबाबत बोलताना स्वराज्य फाऊंडेशनचे काळाचौकी इथे राहणारे संस्थापक अध्यक्ष उदय पवार म्हणाले की, "मागील टाळेबंदीत सर्वसामान्य नागरिकांचे जेवण मिळत नसल्यामुळे प्रचंड हाल झाले. त्यामुळे अनेकांनी टाळेबंदी असताना देखील पायी चालत जाऊन आपला गाव गाठला. निदान शहरात राहून उपाशी राहण्यापेक्षा गावी जाऊन काहीतरी कमवून खाऊ अशी मानसिकता या नागरिकांची होती. त्यावेळी अनेक सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन अनेकांना जेवण, पाणी पुरवलं देखील, परंतु त्यातील काहींना मिळालं आणि काहींना नाही मिळालं. आता राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 4 मार्चला काही निर्बंध जाहीर केले. परंतु तरीदेखील घरातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी नाही. त्यामुळे अखेर 15 मार्च पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध जाहीर केले. या नियमांनुसार नागरिकांना घरातून बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे हातावर पोट असणारे टॅक्सी ड्रायव्हर, छोटे व्यावसायिक, कामगार, रिक्षा चालक यांची उपासमार होण्याची शक्यता आहे. मागील टाळेबंदीत अन्नधान्य वाटणारे भरपूर होते परंतु आता मात्र ही संख्या कमी आहे. त्यामुळे या लहान कष्टकरी मंडळीची उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक पाऊल पुढं टाकत आजपासून दुपारी 12 ते 1 शहीद भगतसिंग मैदान मुख्य दरवाज्यासमोर काळाचौकी येथे जेवण वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे." 


"शनिवारी दुपारी हा विचार आमच्या मनात आला आणि आम्ही तत्काळ कृती करत हा निर्णय जाहीर देखील केला आहे. आम्ही हा उपक्रम पुढील 10 दिवस करणार आहोत. जर पुढील काळात आणखी काही दिवस निर्बंध वाढले तर त्याकाळात देखील आम्हाला मदत करता येऊ शकेल का याचा विचार आम्ही करत आहोत," असं उदय पवार यांनी सांगितलं.


सध्या छोटे व्यवसायिक घरी आहेत. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी यांना जेवण मिळतं त्यामुळे किमान एकवेळची त्यांची गरज भागावण्याचा प्रयत्न स्वराज्य फाऊंडेशन करत आहे.