मुंबई : महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीत हायकमांडकडे महाराष्ट्राचा प्रभारी बदलण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत काँग्रेसची फक्त एक जागा निवडून आली होती. या पराभवाचे खापर अशोक चव्हाण यांच्यावर फुटले आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. असं असलं तरी तिकीट वाटपापासून पक्षातील विविध गटांतील वाद थांबवणे ही जबाबदारी पक्ष प्रभारीची देखील असते.


लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षात गट जास्त पडले. इतकंच नाही तर विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. तिकीट वाटपात देखील अनेक घोळ झाले. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगेंऐवजी दुसरा प्रभारी देण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी आहे.


महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीत हायकामंडकडे महाराष्ट्राचा प्रभारी बदलण्याची मागणी केली असून खरगे ऐवजी हिंदी पट्ट्यातील नेत्याला प्रभारी देण्याची मागणी महाराष्ट्रातील नेत्यांनी केली आहे.


मल्लिकार्जुन खरगे यांचे वय पाहता महाराष्ट्रात ते विशेष फिरत नाहीत. त्यामुळे देखील त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर खरं तर काँग्रेस अध्यक्षपदाचा निर्णय प्रलंबित राहिला होता. आता हंगामी अध्यक्ष आल्यावर मात्र प्रभारी बदलून देण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.