मुंबई : भाजपसोबत राहणार की नाही? याचा निर्णय येत्या 10 दिवसात घेणार असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी सांगितलं आहे. नारायण राणे 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात याची प्रतीक्षा आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. काँग्रेस सोडल्यापासून नारायण राणे भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
मी भाजपमध्ये राहणार की माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार हे येत्या दहा दिवसात स्पष्ट होईल. भाजपने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता केलेली नाही. येत्या चार-पाच दिवसात मुख्यमंत्री याबाबत निर्णय कळवणार आहेत. त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं नारायण राणेंनी सांगितलं.
दरम्यान भाजपकडून त्यांना राज्यसभेत खासदारकीही देण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नसून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. मात्र वेटिंगची एक मर्यादा असते, असंही राणे यांनी म्हटलं. त्यामुळे येत्या दहा दिवसात नारायण राणे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सीज कार्यरत
महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी काही एजन्सीज् कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. या एजन्सीजमार्फत राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेल केलं जातं. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ त्याच एजन्सीचे बळी असल्याचा खळबळजनक दावा नारायण राणेंनी केला. मी त्या एजन्सीला शोधून काढलं आहे. या एजन्सीत अनेक हुशार मंडळी कार्यरत आहेत. अनेक नेते या एजन्सीच्या लिस्टमध्ये आहेत. मात्र ते कुणासाठी काम करतात की केवळ पैशासाठी काम करतात हे माहित नसल्याचं राणेंनी सांगितलं.