Maharashtra Budget Session LIVE:  आज विधानभवनात भाजपाच्या वतीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. यावेळी भाजपच्या आमदारांनी स्वाक्षरी केल्या. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील यावर स्वाक्षरी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. झालं असं की, विधानभवनाच्या पायऱ्यांच्या शेजारी असलेल्या डायसवर भाजप नेते आपल्या सह्या करत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ तिथं आले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी नरहरी झिरवाळ यांना सही करण्यासाठी पेन दिला आणि त्यांनी सही केली.


यावेळी झिरवाळ यांना पेन देणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी एबीपी माझानं चर्चा केली असता ते म्हणाले की, झिरवाळ यांची सही दिवसा घेतली आहे. देशद्रोह्याशी आर्थिक व्यवहार ठेवणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी त्यांचं समर्थन आहे. मला त्यांचं कौतुक वाटतं कारण आपण अध्यक्ष म्हणून राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोणातून विचार करुनच आपली भूमिका पार पाडली आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.


आदित्य ठाकरे पेन घेऊन गेले


यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही सही करण्यासाठी मंगेश चव्हाण यांनी विनंती केली. पण आदित्य ठाकरे पेन घेऊन तिथून निघून गेले.  


'पायऱ्यांवर इतका गोंधळ असतो की माणूस गोंधळून जातो'


याबाबत बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पायऱ्यांवर इतका गोंधळ असतो की माणूस गोंधळून जातो. नरहरी झिरवळ ही साधी व्यक्ती आहे. आदिवासी समाजातून आलेली व्यक्ती आहे. कारण नसताना त्यांना घेरण्याचं काम करू नये, असं आव्हाड म्हणाले. 


नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांची स्वाक्षरी मोहीम


नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजप आमदार जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. विधीमंडळाच्या पायऱ्यांच्या शेजारी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी बॅनर ठेवला होता. त्यावर भाजपचे सर्व आमदार स्वाक्षरी केल्या.



 


इतर महत्वाच्या बातम्या


राष्ट्रवादीनं ठणकावून सांगितलं, विरोधकांनी कितीही गोंधळ घालू द्या, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाही 


Devendra Fadnavis : दाऊदच्या माणसाला वाचवण्यासाठी सरकारवर दबाव आहे का? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल