Maharashtra Budget Session : उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरु होत आहे. या अधिवेशनात नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. मात्र राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं आहे. कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले. 
 
नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे-नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.


विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.  


शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असेही जयंत पाटील म्हणाले.


या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.  विधानसभा अध्यक्ष पद निवडीबाबत सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील. विरोधकांनी चहापान कार्यक्रमाला यावं अशी माझी विनंती आहे. त्यानिमत्ताने साधक बाधक चर्चा होईल, असंही पाटील म्हणाले.  


राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल असेही जयंत पाटील म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Budget Session : 3 ते 25 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha