मुंबई: राज्याचा 2018-2019 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सभागृहात सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून असेल,  असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

शेतकरी हिताच्या योजनांसाठी अंदाचे 83 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी या घटकाबरोबरच सर्वसामान्य व्यक्ती, नोकरदार आणि व्यापारी या सर्वांना सामावून घेणारा अर्थसंकल्प सादर करु, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान गुरुवारी आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. राज्याच्या कृषी क्षेत्राची वाढ घसरली असून, अर्थव्यवस्थेची वाढही मंदावली असल्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे.

कृषी विकासदरात मोठी घट

राज्याच्या कृषी विकासदरात मोठी घट झाल्याचं आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी क्षेत्रात 8.3 टक्क्यांची घट झाल्याचं या अहवालात नोंद करण्यात आलं आहे. अपुऱ्या पावसामुळे हा दर घटल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी कृषी विकास दर 30.7 टक्के होता. पण यंदा यात मोठी घसरण होऊन, हा उणे 14.4 टक्के इतका राहण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कृषी संलग्न क्षेत्रातही लक्षणीय घट अपेक्षित असल्याचेही अहवातून स्पष्ट झाले आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च वाढला
दरम्यान, राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. राज्याचं गेल्या वर्षी एकूण उत्पन्न 2 लाख 43 हजार कोटी रुपये इतके होतं. पण सरकारने 2 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यंदा राज्याच्या तिजोरीत 4,511 कोटीची वित्तीय तूट असल्याचं अहवालातून स्पष्ट करण्यात आलं.

संबंधित बातम्या

राज्याच्या कृषी विकासदरात मोठी घट, विकासदरही घटणार